नांदेड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा शासकीय विश्रामगृहातील मुक्काम आणि त्यांच्या वास्तव्यामुळे होणार्‍या गर्दीचा अंदाज धेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना गुरुवार-शुक्रवारदरम्यान शहरातील एका बड्या हॉटेलमध्ये थांबावे लागले.

स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहणासाठी पालकमंत्री सावे यांचे शुक्रवारी (दि.१४) रात्री नांदेड शहरात आगमन झाले. मुंबई ते वाशिमपर्यंतचा प्रवास समृद्धी महामार्गावरून करत ते हिंगोलीमार्गे येथे आले. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था आधी मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहातच केली होती; त्यांच्या दौरा कार्यक्रमातही मुक्काम विश्रामगृहातच नमूद करण्यात आला होता. पण मनोज जरांगे त्याचदिवशी वरील विश्रामगृहालगतच्या दुसर्‍या विश्रामगृहामध्ये मुक्कामी असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहाकडे येण्याचे टाळल्याची माहिती आता समोर आली आहे.

गुरुवारी रात्री ९च्या सुमारास पालकमंत्र्यांचे नांदेडमध्ये आगमन होताच ते शहरातील हॉटेल सिटी सिम्फनी मध्ये गेले. तेथेच त्यांनी मुक्काम केला. शुक्रवारी ध्वजारोहण आणि इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर काही नियोजित भेटीगाठी त्यांनी याच हॉटेलमध्ये पार पाडल्या. पालकमंत्र्यांच्या नांदेड वास्तव्यादरम्यान शासकीय विश्रामगृहाचा परिसर जरांगे समर्थकांच्या गर्दीने व्यापला होता. जरांगे यांनी गुरुवारी सायंकाळी लोहा तालुक्यातील मारतळा येथील एका मंगल कार्यालयात चावडी बैठक घेतली. नंतर नांदेडमधील मुक्कामात त्यांनी विश्रामगृहातच कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठका घेतल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान मुंबईतील आगामी आंदोलनासंदर्भात त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

नांदेडमधील वास्तव्यात मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती बाहेर आली आणि सर्वदूर पसरली होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विश्रामगृहामध्येच स्थानिक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉ.गजानन शिंदे नागेलीकर यांनी त्यांची तपासणी करून विश्रांतीचा सल्ला दिला होता. काही वेळ विश्रांती करून जरांगे शुक्रवारी सायंकाळी नांदेडहून हिंगोलीकडे रवाना झाले. या प्रवासादरम्यान नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठींबाही दिला.