छत्रपती संभाजीनगर/बीड : मुंबईतील मराठा आंदोलकांचे जेवणाबाबत हाल होत असल्याचे वृत्त धडकताच त्यांच्यासाठी मराठवाड्याच्या विविध भागांतून दशम्या, धपाटे, चपात्या, भाकरी-ठेचा, चटणी, लोणचे तसेच अंबाजोगाई, केज, धारूर, बीड, माजलगाव या भागातूनही भाकरी, धपाटे, दशम्या लोणचे, ठेचा, चटणी, पाण्याच्या बाटल्या शनिवारी रवाना करण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरसह इतर भागांतून, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यातील कळंब आदी तालुक्यांमधून ही शिदोरी पाठवण्यात आली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातून मिळून तीन टेम्पो भरून खाद्यसाठा घेऊन आम्ही मुंबईत दाखल झालो असल्याची माहिती ॲड. माधव जाधव यांनी दिली. घाटनांदूरसारख्या गावापासून मुंबईचे आझाद मैदान ५९० किमी अंतरावर असून, स्थानिक महिलांनीही शिदोरी पाठवून अप्रत्यक्षपणे आंदोलनात सहभाग नोंदवताना आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय येऊ नका, असा संदेश दिल्याचा दावा ॲड. जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. आंदोलनासाठी रवाना झालेले माझे मेहुणे सतीश देशमुख यांचा नारायणगाव येथे वाटेतच हृदयविकाराने मृत्यू झाला. परंतु, कौटुंबीक दु:खापेक्षा समाजाची समस्या मोठी समजून आपण देशमुख यांच्या तिसऱ्या दिवसाचे विधी आटोपून शनिवारी मुंबईकडे निघाल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात समाज माध्यमातून मराठा बांधवांना शिदोरी पाठवण्याबाबतचे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेक हात पुढे आले. वैजापूर तालुक्यातील अनेक गावांनी एक क्विंटल मिरच्यांचा ठेचा पाठवला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या कळंबसह अन्य तालुक्यांमधून भाकरी-चटणीच्या रुपात शिदोरी रवाना करण्यात आली.