Supriya Sule : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू आहे. आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच भेटीनंतर सुप्रिया सुळे पुन्हा परत जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी आडवली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घालत गाडी पुढे जाऊ देण्यास नकार दिला आणि शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांवर गाडी अडविण्याचे दृश्य दिसत असताना काही कार्यकर्ते शरद पवारांच्या विरोधात घोषणा देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला रस्ता करून दिला आणि सुप्रिया सुळे या त्या ठिकाणाहून रवाना झाल्या. मात्र, यावेळी काही आंदोलकांनी पाण्याची बाटलीही फेकण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे काहीवेळ मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सीएसएमटी परिसरात सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेरलं | Supriya Sulehttps://t.co/2jrmCKvB4K@supriya_sule pic.twitter.com/pqNrNC06Ra
— LoksattaLive (@LoksattaLive) August 31, 2025
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेल नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आलेला आहे. तसेच त्यांचं म्हणणं होतं की मुंबई महापालिका आयुक्तांना विनंती करा की आंदोलनस्थळी स्वच्छतेची आवश्यकता आहे. तसेच आंदोलनस्थळी लाईट्सची देखील मागणी करण्यात आली आहे. याबाबत मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोलणार आहे”, असं सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
VIDEO | Mumbai: NCP (SP) leader Supriya Sule meets Maratha activist Manoj Jarange Patil; demands an all-party meeting and a special session of the Maharashtra legislature to discuss the Maratha quota issue. She says, “From the very first day, I have been demanding that this issue… pic.twitter.com/R6tHdMJZ81
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2025
“मनोज जरांगे यांच्यासह सर्व आंदोलकांचा निरोप आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की सर्व पक्षांना बोलवा, सर्वपक्षीय बैठक बोलवा. हवं तर एक दिवशीय अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढा. या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते भेट देण्यासाठी येत आहेत. मग जर कोणाचाही विरोध नसेल तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात तातडीने या संदर्भातील निर्णय घ्यावा. अधिवेशन बोलवा, चर्चा करा आणि निर्णय घेऊन टाका”, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.