जालना : मराठा आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आणत आंदोलनकर्ते मनोज जरांगे व समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत आंदोलनास कुठे परवानगी, किती वेळ परवानगी याचा तपशील जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावी आंदोलकांच्या संख्येत भर पडत असल्याचे दिसून आले. ऐन गणपतीच्या सणात आरक्षण आंदोलन होणार असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात बीडचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) संदीप क्षीरसागर, गेवराईचे भाजपचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सहभाग नोंदवला. घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांच्या नावाचे शुभेच्छांचे फलकही मोठ्या प्रमाणात होते. कार्यकर्त्यांच्या चहा व नाष्ट्याची सोय टोपे यांच्यामार्फत करण्यात आल्याचे आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितले. सकाळी अंकुशनगर येथे पत्नी व मुलांची भेट घेतली. आंदोलनस्थळी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून ते निघाले.
कार्यकर्त्यांना आझाद मैदान येथे आंदोलनास परवानगी मिळाली असली तरी त्यात बऱ्याच अटी टाकण्यात आल्या आहेत. या अटी वाचून झाल्यावर त्यावर बोलू, असे जरांगे यांनी सांगितले. दुपारी २.२५ च्या दरम्यान शहागड, पैठण फाटा गावांहून पुढे गेल्यानंतर विविध ठिकाणी त्यांचे आरक्षण समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. वाहतुकीस अडथळे येणार नाहीत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ नये, एवढा बंदोबस्त ठेवल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवली असल्याचे सांगण्यात आले.