छत्रपती संभाजीनगर : गोदावरी व सिना नदीवरील पुरांमुळे अनेक विहिरी गाळाने भरल्या आहेत. अनेकांचे मोटार व पाईपलाईनही वाहून गेली. तुषार, ठिबक सिंचनाचे पाईप गेल्याने पूर ओसरल्यावर मोठ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या २८ गावातील योजना अतिवृष्टीमुळे बंद झाली आहे

आष्टी तालुक्यातील पेटपांगरा गावातील तलाव अतिवृष्टीने फुटला. पावसाचा जोर एवढा होता की, तलावातील गाळ, पाणी सारे साेपान कारभारी मिसाळ यांच्या शेतात शिरले. सोपान आणि त्यांचे भाऊ यांच्या नावावर प्रत्येकी साडेतीन एकर जमीन. थोडीशी जमीन आईच्याही नावे. पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने कापूस, कांदा, तूर हे पीक लावले. पण एकाच पावसाने सारे पीक गेले. विहिरीमध्ये गाळ शिरला. ती पूर्णत: बुजलीच. विहिरीतील मोटार, ३० पाईप वाहून गेले. सोपान यांच्या शेतात आता मोठेमोठे दगड आले आहेत. आता सोपानला ऊसतोडणीला जाण्याचे वेध लागले आहेत. दसऱ्यापर्यंत जेवढे होईल तेवढे दगड हटवू. मग जमले तर रब्बी पेरू असे ते सांगतात.

शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यावर ते उसतोडणीसाठी जाणार आहेत. उसतोडणी हाच मजुराचा एकमेव पर्याय दिसत असल्याचे ते म्हणाले. याच गावात नदीकाठच्या ४० विहिरी काही अंशत: काही पूर्णत: गाळाने भरल्या. आता गाळ काढायला नवे पैसे. मोटार पाईपसाठी सुमारे ५० हजार रुपये लागणर आहेत. हाती फक्त कोयता एवढेच पैसे मिळविण्याचे साधन आहे. पंचनाम्यांमध्ये पिकांपेक्षाही पायाभूत सुविधांमधील नुकसान अधिक असल्याचे सांगण्यात येते.

सिंदफणा आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेक शेतात पाणी आले. विहिरी गाळाने भरल्या. अगदी पाणी पुरवठ्याच्या २८ विहिरी बुजल्याने माजलगाव, आष्टीमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे. आजही अनेक गावांत वीज पुरवठा खंडित आहे.