Marathwada Heavy Rain : महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. एवढंच नाही तर शेतीमध्ये पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या अतिवृष्टीच्या परिस्थितीवर शेतकऱ्यांना काही मदत मिळणार का? असा सवाल विरोधक विचारत आहेत. या संदर्भात आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई मिळणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
कृषीमंत्री भरणे काय म्हणाले?
“खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पहिल्या अतिवृष्टीचा फटका विदर्भात बसला. त्यानंतर मराठवाडा आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर जवळपास ७० लाख एक्कर पिकांचं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी जमीनीवरील माती देखील वाहून गेली आहे. अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत”, असं कृषीमंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.
“सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की हे नैसर्गिक संकट आहे. आपल्याला या संकटाला समोरं जावं लागेल आणि धीर धरावाच लागेल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे. ज्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई दिली जाईल.”
शरद पवारांनी काय म्हटलं?
शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील पूरस्थितीबाबत सविस्तर भाष्य केलं. “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून येणारं उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडलेलं नाही”, असं शरद पवारांनी सांगितलं.
यावर शरद पवारांनी राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी मदत करावी, अशी विनंती केली आहे. “आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करणं व नुकसानभरपाई देणं या दोन गोष्टी तातडीने करणं आवश्यक आहे”, असं शरद पवार म्हणाले.
