छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा कापसाच्या प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात २ लाख ४२ हजार ८६४ हेक्टरने घट दिसते आहे. टक्केवारीतील घट पाहता ती १२.५२ एवढी आहे. कापसातून प्रत्यक्ष उत्पादन हाती येण्यास लागणारा तब्बल चार महिन्यांचा कालावधी आणि मजूर टंचाई, घटते दर ही प्रमुख कारणे क्षेत्र घटण्यामागची सांगितली जात आहेत. मात्र, भारतीय कापूस निगमचे (सीसीआय) अधिकारी क्षेत्रात घट झालेली असली तरी उत्पादनात फारशी घट होणार नाही, असे सांगत असून या वर्षी ८५ लाख गाठी उत्पादन होईल, असा दावा केला जात आहे.

कृषी विभागाकडील गतवर्षीच्या (२०२४-२५) खरीप हंगाम अहवालानुसार कापसाचे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पेरणीचे क्षेत्र १५ लाख ४४ हजार ४१२.४३ हेक्टर, तर प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र १३ लाख ७२ हजार ८१०.६० हेक्टर होते. गतवर्षीची कापसाच्या पेरणीची टक्केवारी ८८.८९ एवढी होती. तर यंदा ४ जुलै (२०२५-२६) रोजीच्या अहवालानुसार कापसाचे सर्वसाधारण पेरणीचे क्षेत्र १४ लाख ७९ हजार ५३५.६२, तर प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र ११ लाख २९ हजार ९४६.६० हेक्टर आहे. टक्केवारीत ७६.३७ एवढे आहे.

लातूर विभागातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढ असून, लातूर, धाराशिव जिल्ह्यात लक्षणीय घट आहे. लातूरमध्ये गतवर्षी कापसाचे क्षेत्र २१६.९२ टक्के होते तर यंदा ते १३४.०३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. धाराशिवमध्ये तर गतवर्षी सर्वसाधारण ५ हजार २६० हेक्टरपैकी केवळ ५७९.७० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यंदा सर्वसाधारण आणि पेरणीचेही क्षेत्र कमालीचे घटले आहे. सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ६३७ हेक्टर असून, पेरणीचे क्षेत्र केवळ १५५ हेक्टर असल्याचे अहवालात नमूद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती संभाजीनगर विभागात मात्र, चांगलीच घट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गतवर्षी ९१.८१ टक्के कापसाच्या क्षेत्र होते, यंदा ६९.५७ टक्केच पेरणी झाली आहे. जालन्यात गतवर्षी ९४.३८ टक्के होते, यंदा ८१.६९ टक्के असून, बीडमध्ये साडेतीन ते चार टक्क्यांपर्यंत घट आहे.