छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे चार ते पाच गावात पाणी शिरल्याने नागरिक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून उपलब्ध झाली आहे. रावणगाव २२५ , हसनाळ ७ ते ८ भासवाडी येथे २० भिंगेली ४० एवढे नागरिक अडकले असून छत्रपती संभाजीनगरहून लष्काराच्या एका चमूलाही बोलावण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल पथक पाठविण्यात आले आहे दरम्यान इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळेही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरू झाले आहेत.
या तालुक्यातील भेडेगावला पाण्याने पूर्णत: वेढले आहे. अनेक घरांवरील पत्रे कोसळले आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड येथील आपत्ती निवारण चमू मुखेड येथे पोहचला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यातील बेरळी येथे जुन्या गावाला जोडणारा पुल वाहून गेला असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान उदगीर तालुक्यातील पावसाचा कहर अधिक असून उदगीर -मुक्रमाबाद- देगलुर रोडवर धडकनाळ- रावी या रस्त्यावरील पुलावरुन एक कार वाहुन गेली आसल्याचे सांगण्यात आले. रावणगाव २२५ , हसनाळ ७ ते ८ भासवाडी येथे २० भिंगेली ४० जण सुरक्षित स्थळी हलवली. एसडीआरफ प्रतिसाद, शिघ्र प्रतिसाद, शोध व बचाव, आर्मीची टीम मागवली. इसापूरचे दरवाजे उघडलेले.
लातूर जिल्ह्यात उदगीर – देगलूर मार्गावरील बस वाहतूक बंद
उदगीर- देगलूर मार्गावरील करजखेल येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर-देगलूर मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच उदगीर ते हानेगाव मार्गे हंगरगा वरील सावरगाव ते हंगरगा मधील गळसुबाई तांडा येथील पुलावर पाणी असल्यामुळे उदगीर- हानेगाव मार्गे हंगरगा वाहतूक बंद झाली आहे. वाहने हानेगाव- एकंबा- मुर्की मार्गाने वळविण्यात आली आहेत.
उदगीर- होकर्णा या मार्गावरील भवानी दापका येथील पूलावर पाणी असल्यामुळे उदगीर- होकर्णा, उदगीर- हानेगाव मार्गे बोंथी वाहतूक बंद झाली आहे. हे वाहन खेर्डा, डोंगरगाव, एकंबा, मुर्की या मार्गे वळविण्यात आले आहे. माणकेश्वर – उदगीर या मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. सदरचा मार्ग बंद आहे. अहमदपूर-अंधोरी मार्ग पावसामुळे बंद आहे.
रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीला आला असून बांधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, असे अवाहन लातूर प्रशासनाने केले आहे.