Allegations Against Sanjay Shirsat Son’s Siddhant Shirsat : विवाहित महिलेशी विवाह करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस तक्रार केली असून सिद्धांत शिरसाटलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या संबंधित महिलेचे वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
अॅड. चंद्रकांत ठोंबरे म्हणाले, “संबंधित महिला मुंबईत राहते. फेसबुकवर त्यांची ओळख झाली. सिद्धांत शिरसाटने तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. तिला आत्महत्येची धमकी दिली. डोक्याला गोळी मारण्याचे आणि हाताला ब्लेडने कापण्याचे फोटो त्याने तिला पाठवले. तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं.”
“शेवटी ती लग्नाला तयार झाली, तिला लग्नासाठी घटस्फोट घ्यायला लावला. (पहिल्या नवऱ्यापासून) दोन-चार महिन्यात तिने घटस्फोट घेतला. २०१८ पासून त्यांचे संबंध होते. तिने सर्व व्हिडिओ आणि कागदपत्रे दाखवले आहेत. आता महिन्याभरापूर्वी त्याने नवीन बंगल्यात एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केल्याचे फोटो त्याने तिला पाठवले”, अशी माहिती अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली.
मंत्रीपदाचा दबाव आणून पोलीस कारवाई नाही
“सिद्धांत शिरसाटविरोधात २०२४ डिसेंबरमध्ये पोलीस तक्रार करण्यात आली. परंतु, त्यावर कारवाई झालेली नाही. या तक्रारीची प्रतही आमच्याकडे आहे. मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा दबाव आणून काहीही कारवाई केली नाही. ३० तारखेला महिला अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत. लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या अनुषंगाने सिद्धांत याची बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क केला, तसेच त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवूनही म्हणणे मांडण्याविषयी विनंती केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
सुषमा अंधारे यांची टीका
“बापाच्या सत्तेचा उन्मत्तपणा राज्यातील जनतेला माहिती आहेच. तोच उन्मत्तपणा मुलात आला असेल तर त्यांना रोखणं गरजेचं आहे. हे लोक गोरगरिबांच्या लेकीबाळींचा छळ करत असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.