सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील साताऱ्यातील चाहूर क्षेत्राच्या हद्दीत भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीमध्ये संबंधित गोडाऊन मालकाचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडाऊनच्या पिछाडीला पडलेल्या जळणाऱ्या प्लास्टिकने पेट घेतल्यामुळे ही आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी ही आग आटोक्यात आणली. या आगीची झळ येथील एका ट्रकला बसल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे-बेंगलोर महामार्ग नजीक पुणे बाजूला जाणाऱ्या सेवा रस्त्यावर राहुल कांबळे यांचे आर के इंटरप्राईजेस नावाचे भंगार गोडाऊन आहे. यामध्ये लोखंडी साहित्य, काचा, प्लास्टिक, रद्दी यांचा समावेश आहे. सकाळी साडेआठच्या दरम्यान गोडाऊनच्या पाठीमागील बाजूने अचानक धुराचे लोट उठू लागले आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सर्वत्र धुराचे लोट उसळले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे येथील परिसरातील नागरिकांची एकच धावपळ झाली. आगीने वेग पकडल्यामुळे प्लास्टिक, रद्दी तसेच गोडाऊन मधील इतर साहित्य पेटले. आग आटोक्याच्या बाहेर जाऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची खबर सातारा अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन ही आग विझवली. अनेक तास आग विझवण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोडाऊन मालक राहुल कांबळे यांनी या दुर्घटनेत तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. गोडाऊनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेमध्ये प्लास्टिक व इतर साहित्य पडून असते. वडाच्या बाजूने घनदाट झाडी असल्यामुळे येथे रात्री उशिरा मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यांच्याकडूनच कदाचित पेटती सिगरेट अथवा इतर तत्सम कारणामुळे ही आग लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने येथील विद्युत पुरवठा खंडित केला. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेण्याकरता पंचनामा सुरू केला होता. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.