बीड : गेल्या काही काळात बीड जिल्ह्यातील पाच टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यात या टोळ्यावंर विविध पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लाखो रुपयांचे केबल व इतर साहित्य या टोळीने चोरल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मकोका अंतर्गत कारवाई झालेली ही बीड जिल्ह्यातील सहावी टोळी आहे.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लिंबागणेश शिवारातून पवनचक्की क्र.३९ वर बारा ते चौदा चोरट्यांनी १७ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केले होते. यावेळी चोरट्यांनी या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना मारहाणीचा देखील प्रयत्न केला, यावेळी सुरक्षा रक्षकानेे परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडल्याने राजू विष्णू काळे हा ठार झाला होता. या प्रकरणात तपास केला असता आरोपी टोळीप्रमुख सुभाष भास्कर काळे, बाबुशा भीमराव काळे, रामा उर्फ बिल्या शंकर काळे यांना अटक करण्यात आली तसेच पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली.

या गुन्ह्यात चार आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आलेली आहे. या टोळीने आजपर्यंत अहिल्यानगर, सोलापूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात अकरा गुन्हे केल्याचे समोर आले आहे. यामध्ये दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न करणे, घरफोडी करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे असे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व सहायक पोलीस अधीक्षक केज यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळी विरोधात मकोका अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. तो मान्य करण्यात आला आहे.