कोल्हापूर : विधानसभा निवडणुकी वेळी माझ्या पराभवासाठी हरतऱ्हेने अनेक प्रयत्न करण्यात आले. कोणत्या जातीत जन्माला यावा हे काही माझ्या हातात नव्हते. जातीचा मुद्दा मांडला जात असल्याने मीही थोडा घाबरलो होतो. कागलमधील जनता पाठीशी उभी राहिल्याने मी विजयी झालो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सांगाव ( ता. कागल) येथे विकासकामांचा शुभारंभ व हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही केंद्र, गावांमध्ये मते कमी पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ही कसर भरून काढून महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही.
मानेंना आमदार करणार
अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, असा उल्लेख करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक प्रताप तथा भैया माने यांना संधी देऊन आमदार करणार आहे. हा मतदारसंघ भाजपने दोन वेळा घेतला आहे. आता लहान भाऊ म्हणून राष्ट्रवादीचा नंबर आहे, असा दावा त्यांनी केला.