तीन रुपयांत मिळणाऱ्या विषारी द्रव्याचा सर्रास वापर
सोलापुरातील सुमारे ७० हजार महिला विडी कामगारांना महिला बचत गटाच्या नावाखाली मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चांगलाच विळखा पडला असून यात कर्जाची परतफेड करता येईना म्हणून विडी कामगार पार खचत चालल्या आहेत. त्यातून आत्महत्या करून थेट मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आत्महत्येसाठी अवघ्या तीन रुपयांत कोणत्याही किरकोळ किराणा मालाच्या दुकानात मिळणारी पिवळ्या रंगाची मोरछाप पुडीचा आधार घेतला जात आहे.
शहराच्या पूर्व भागात पद्मशाली वीणकर समाजातील गोरगरीब महिला मोठय़ा संख्येने विडी उद्योगात काम करतात. विधवा, परित्यक्ता असलेल्या महिलांसह आर्थिकदृष्टय़ा गरीब असलेल्या महिलांना विडी वळण्याच्या कामाचा आधार मिळतो. मुळात किमान वेतनापेक्षा कमी मजुरीत काम करणाऱ्या महिला विडी कामगारांवर एकापाठोपाठ संकटांची मालिका सुरूच आहे. केंद्रीय धूम्रपानविरोधी कायद्यातील कठोर तरतुदीमुळे तयार विडी बंडलाच्या वेष्टनाचा तब्बल ८५ टक्के भाग वैधानिक इशाऱ्यासाठी वापरण्याचे बंधन आहे. त्यामुळे विडी उद्योग घटत असतानाच परिणामी विडी कामगारांचा रोजगारही संकटात आला आहे. यातच गतवर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा फटका विडी कामगारांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. दोन-तीन महिने विडी कामगारांना मजुरीपासून वंचित राहावे लागले असताना दुसरीकडे बँंकांद्वारेच मजुरी अदा करण्याचे बंधन घालण्यात आल्याने अशिक्षित विडी कामगार वैतागल्या आहेत.
या पाश्र्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी विडी कामगारांच्या भोवती कर्जवसुलीचा फास आवळायला सुरूवात केल्यानंतर कर्ज परतफेड कशी करायची, या विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय विडी कामगार घेत आहेत. महिला मनाने खंबीर असतात. कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिकता त्यांच्या अंगी बाणवलेली असते. परंतु सोलापुरात महिला विडी कामगार अशा आर्थिक विवंचनेमुळे पार खचल्या आहेत. त्यातून आत्महत्यांचे प्रकार घडू लागले आहेत. काल सोमवारी भारताबाई श्रीनिवास गणपा (वय ४५,, रा. विनोबा भावे झोपडपट्टी, दत्तनगर, सोलापूर) या विडी कामगाराने केलेल्या आत्महत्येमागे हेच कारण आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसा नसल्याने आलेल्या नैराश्येतून भारताबाईने आत्महत्येचा मार्ग पत्करला.
शहराच्या पूर्व भागात आजकाल अशा प्रकारच्या आत्महत्या करण्यासाठी मोर छाप पिवळ्या रंगाच्या पुडीचा आधार घेतला जात आहे. घरासमोर अंगणात शेणसडा मारल्याप्रमाणे पिवळा रंग मारला जातो. या पिवळ्या रंगाची मोर छाप पुडी अवघ्या तीन रुपयांत कोणत्याही छोटय़ा किराणा दुकानात उपलब्ध होते. या पुडीतील पिवळा रंग विषारी असतो. हा रंग पाण्यात मिसळून प्यायला तर काही तासात जीव जातो. अशा पिवळ्या रंगाच्या मोर छाप पुडय़ांचा आत्महत्यासाठी सर्रास वापर होऊ लागल्याने अलीकडे अन्न व औषध प्रशासनाने व पोलिसांनी काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर धाडी घालून विषारी पिवळ्या रंगाच्या मोर छाप पुडय़ांचा माल हस्तगत केला होता. आता पुन्हा बाजारात अशा विषारी पुडय़ा सहजपणे उपलब्ध होऊ लागल्या आहेत.