अहिल्यानगर : कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरिपासाठी आज, गुरुवारी रात्रीपासून आवर्तन सोडण्याचा आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्याचा फायदा नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख हेक्टरवरील पिकांना होणार आहे.
सद्य:स्थितीत धरणात उपलब्ध पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन ‘ओव्हरफ्लो’चे पाणी लाभक्षेत्रातील गावांना देण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासूनच आवर्तन सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लाभक्षेत्रात अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना धोका निर्माण झाला आहे. लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनीही आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्याचा विचार करून आवर्तन सोडण्याचे निर्देश विखे यांनी दिले.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत; पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्राच्या शेवटच्या गावांना पाणी मिळेल, असे काटेकोर नियोजन करण्याची सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.