चिपळूण – वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न पडता, वणवा होऊच नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाकडे वणवा मुक्तीसाठी स्वतंत्र योजना नसली, तरी जनजागृती मोहिमेची सुरुवात आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून करीत आहोत. या अभियानाचा शुभारंभ मी आज चिपळूणमधून करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी व ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या वतीने आयोजित ‘वणवा प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा’ व खैर रोपे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे पार पडला.

या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, वनमंत्री असताना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यात वणवा मुक्तीसाठीचे पहिले सादरीकरण दिले. त्यातून समिती स्थापन झाली होती, पण भरपाईच्या स्वरूपावरच चर्चा अडकली. तरीही त्यांनी उचललेले पहिले पाऊल विसरता कामा नये. नंदुरबार येथील वन अधिकारी साळुंखे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, “सुरक्षा रक्षक नेमल्याने तिथे ७० टक्के वणवे कमी झाले.

उर्वरित ३० टक्के वणवे हे सिगारेट, माचीसच्या काड्या, भांडण, विजेच्या स्पार्किंगमुळे लागतात. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी जाणीवपूर्वक वणवा लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात चार टायगर आणि सहा ब्लॅक पॅंथर आढळून आले आहेत. त्यामुळे जंगलसंवर्धन अधिक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय शासनाच्या निधीतून आंबा, काजू व खैर लागवडीसाठी साडेचार लाख रोपे उपलब्ध करून देण्यात आली असून, दरवर्षी ही मोहीम दहा-पंधरा वर्षे चालवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार शेखर निकम यांनी वणवा प्रतिबंधासाठी महावितरणने विजेच्या तारा तपासाव्यात, विडी-सिगारेट टाकू नयेत यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे, आणि वणव्यामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पालकमंत्र्यांकडे केली. या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, विनोद झगडे, रामशेठ रेडीज, शहानवाज शहा, भाऊ काटदरे, विश्वास पाटील, समीर कोवळे, बापू काणे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, जयद्रंथ खताते, वन अधिकारी प्रियंका लगड, अंकिता तरडे, राजेंद्र पाटील, प्रकाश सुतार, रणजीत गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.