सांगली : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याकडेला असलेली दहा दुकाने शुक्रवारी पहाटे चार जेसीबी यंत्राच्या माध्यमातून उध्दवस्त करण्यात आली. यामध्ये सुमारे एक कोटी साडेतेरा लाखाची हानी झाली आहे. जागा मालकीवरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरज शहरी बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर काही दुकाने, हॉटेल, औषध दुकान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आहेत. ही जागा पडळकर यांनी विकत घेतली असल्याचा दावा केला जात आहे. या दुकानांना जागा खुली करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातून गेले काही दिवस हा वाद सुरू होता. शुक्रवारी पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास अचानक चार जेसीबी आणून या  जागेत कार्यरत असलेली दहा दुकाने पाडण्यात आली. यामध्ये दुकानात असलेेले साहित्य, फर्निचर, वातानुकलित यंत्र यांच्यासह इमारतीचाही चुराडा करण्यात आला. यावेळी या जेसीबी अडविण्याचा प्रयत्नही जमावाने रोखला.

VIDEO :

याबाबत विशाल सन्मुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पडळकर यांनी शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात, लाठ्या, काठ्या, लोखंंडी सळई यासारखे घातक हत्यारे घेउन आला. दंगा करीत जेसीबीच्या मदतीने दुकाने पाडली. यावेळी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात असताना मोहमंद लियाकत सय्यद हा जखमी झाला आहे. दुकाने पाडल्यानंतर हा जमाव यामागील झोपड्या घरे पाडण्यासाठी चाल करून आला. मात्र, महिला व पुरूषांनी जोरदार दगडफेक केली. यामध्ये पडळकर यांची स्कार्पिओ मोटार एमएच ४५ एल ९१०० या वाहनाच्या काचा फुटल्या.

सदरचा प्रकार घडत असताना पोलीसांना माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह सुमारे दोनशे पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीसांनी चारही जेसीबी जप्त केले आहेत. दरम्यान, सदरचा प्रकार सत्तेच्या जोरावर करण्यात आला असून घरे पाडली जात असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. यामुळे उपअधिकक्षक व निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. आ. गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांना अटक करण्यात यावी, आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख शंभोराज काटकर यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जागा मिळविण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना रात्रीच्यावेळी गुंडगिरी करून जागा खाली करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आ. गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. तसेच या बेकायदा प्रकाराबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.