रत्नागिरी – मिरकरवाडा बंदराचा विकास आर्थिक विकासाकडे नेणारा आहे. या बंदराच्या पहील्या टप्प्याच्या विकासासाठी ५ कोटी निधी प्रथम खर्च करण्यात येणार आहे. या बंदर विकासाच्या वेळी कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार घेण्यात आली असल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मिरकरवाडा बंदर विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमांच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आयुक्त श्री. तावडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले की, मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणा बाबत आम्हाला कटू निर्णय घ्यावा लागला. मात्र असंख्य लोकांना गैरसमज झाले. एकाच समुदायाला टार्गेट केले जात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आमच्या पुढे फक्त मिरकरवाडा बंदराचा विकास हाच महत्वाचा आहे. महायुतीचे सरकार हे हिंदूत्वाच्या विचारांवर चालणारे आहे. त्यामुळे आमच्यासाठी हिन्दुत्व हे राष्ट्रत्व आहे.
जो व्यक्ती या देशाला आपले राष्ट्र समजतो, तिरंग्याला आपला झेंडा समजतो, आमच्या बरोबर भारत माता की जय म्हणतो त्यांचा विकास आम्ही नक्की करणार. अशा व्यक्तीच्या खान्द्याला खांदा लावून आम्ही काम करतो, असे ही मंत्री राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, मिरकवाडा बंदराच्या पहील्या टप्प्याचा विकास बारा महिन्याच्या आत केला जाणार असल्याचे यावेळी राणे यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मिरकर वाडा बंदराचा विकास करताना कोणावर ही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. भविष्यात मच्छिमारांना चांगले दिवस येतील. महाराष्ट्र राज्यात हे बंदर सगळ्यात मोठे बंदर म्हणून ओळखले जाईल. हजारो कोटीची उलाढाल या बंदरातून होणार आहे. ज्याप्रमाणे पर्सनेट मच्छिमारांना जगवण्याचे काम मत्स्यमंत्र्यांनी केले, त्याप्रमाणे लहान मच्छिमारांना जगवण्याचे काम करावे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असे ही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.