सोलापूर : आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपले अख्खे मंत्रिमंडळासह आले असताना त्याचा धसका दोन्ही काँग्रेससह अन्य पक्षांनी घेतला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर त्यांच्या मांसाहारी भोजनाची बाब पुढे करून निशाणा साधला आहे. मात्र हा आरोप बीआरएस पक्षाने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.

आमदार मिटकरी यांनी आपल्या टूविटरवर केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळाने हैदराबादहून पंढरपूरच्या वारीवर असताना वाटेत उमरगा (जि. धाराशिव) येथे थांबून मांसाहारी भोजनाचा शाही बेत आखला. हा प्रकार शोभनीय आहे का, असा सवाल केला आहे. वारक-यांच्या भावनांशी खेळू नका. पंढरपूरला वारीसाठी येताना दहा हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे. आपल्या अशा वागण्याने अपवित्र करू नका, अशा शब्दांत अमदार मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडताना त्यांच्या भोजन व्यवस्थेची छायाचित्रेही ट्विटरवर शेअर केली आहेत.

तथापि, बीआरएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी आमदार मिटकरी यांचा आरोप स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. केसीआर यांच्या पक्षाचे तुफान महाराष्ट्रात आले असताना येथील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यातूनच केसीआर यांच्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक करण्यात येत आहे, असे माणिक कदम यांनी म्हटले आहे.