राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघांचे दौरे, बैठका, कामाचा आढावा अशा प्रकारचं काम राजकीय नेत्यांकडून सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहेत.

या सर्व घडामोडी सुरु असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. राज्यातील दिव्यांगांच्या आणि कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या योजनांवरुन बच्चू कडू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते आज हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : Prakash Solanke : “पुतण्याला वारस घोषित करुन मी थांबलो, शरद पवारही थांबले असते तर त्यांचं घर..”, कुणी केली ही टीका?

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू, उचलून थेट समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे”, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलं आहे. “आपले विधानसभेमध्ये फक्त दोनच आमदार आहेत तरीही ते घाम फोडल्याशिवाय राहत नाहीत”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

दरम्यान, आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुतीमध्ये आहेत. मात्र, तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेत अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. तसेच बच्चू कडू यांनी अनेकदा महायुती सरकारवर टीकाही केली होती. आता विधानसभा निवडणुकीबाबत बोलतानाही त्यांनी अनेकदा सूचक विधानं केलेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर मी निवडणुकीतून माघार घेईल’

काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला होता. बच्चू कडू म्हणाले होते की, “आम्ही ९ ऑगस्ट रोजी शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदन देणार आहोत. त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहोत. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्यांचा शासन निर्णय काढला तर तर मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार नाही. माझी जागा मी भारतीय जतना पक्षाला किंवा शिवसेनेला देईल. पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग तेच मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.