कराड : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला सालाबाद जाणाऱ्या खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील पालखीचा मानाच्या दिंडीत समावेश करावा, शेतकऱ्यांना गरजेनुसार वीज जोडणी मिळावी आदी मागण्या आज आमदार मनोज घोरपडे यांनी विधानसभेत केल्या. कराड उत्तरमधील प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते आग्रही राहिले.
राज्यभरातून आषाढी वारीसाठी लाखो भाविक पालख्यांसह पंढरपूरला चालत जात असतात. परंतु, यातील काही मोजक्याच दिंड्यांना मानाचे स्थान दिले जाते. वडगाव जयराम स्वामी येथील मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांची पालखी पंढरपूरला जाण्याची १३५ वर्षांची परंपरा आहे. परंतु, त्याची नोंद मानाच्या पालखीमध्ये नाही. या पालखीस मोठी परंपरा असल्याने या पालखीचा मानाच्या पालखीत समावेश व्हावा, अशी मागणी आमदार घोरपडे यांनी विधीमंडळात केली.
शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना आहे. परंतु, सर्वच शेतकरी या योजनेचे लाभार्थी घेऊ शकत नाहीत. तरी ज्या शेतकऱ्यांचे मोटारीचे हेड जास्त आहे. ज्या शेतकऱ्यांची नदीकाठी मोटर आहे किंवा जे शेतकरी कालव्यावर मोटर बसवतात. अशा शेतकऱ्यांना सौर पॅनल बसवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यांना त्यांच्या गरजेनुसार वीज जोडणी मिळावी, अशीही मागणी आमदार घोरपडे यांनी या वेळी विधानभवन सभागृहात केली.