पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत जामीन मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच बुधवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्या गुरुवारी मोर्चाने पोलीस स्टेशनला हजर होण्याची भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी होऊन कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी व तपशील तपासण्यासाठी न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर घडलेल्या प्रकारावरून आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगासह अन्य गुन्हे राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. याबाबत आमदार क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. आज उच्च न्यायालयाने सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान आज क्षीरसागर यांनी एका पत्रकाव्दारे उद्या गुरुवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता यांच्यासमवेत पोलीस स्टेशनला हजर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजन साळवी, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदिप नरके उपस्थित राहणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी गोंधळून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन पत्रकात केले आहे.
गुन्हा रद्द करण्याची मागणी
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरून रद्द करावा, या मागणीचे निवेदन मंगळवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. विजयसिंह जाधव यांना दिले.    
निवेदनात म्हटले आहे की, अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार क्षीरसागर व अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्यात शाब्दिक वाद होऊन विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागले होते. कोल्हापूर शहर हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे व समतेचा पुरस्कार करणारे शहर आहे.
या शहरात यापूर्वी कधीही जातीय तणाव निर्माण होईल असे प्रकार गणेशोत्सवामध्ये घडलेले नाहीत. तरी आमदार क्षीरसागर यांच्यावर लावण्यात आलेले विनयभंगाचे कलम हे कोल्हापूरच्या उज्वल इतिहासाचा व सन्मानाचा विचार करून वरिष्ठ पातळीवरून पोलिसांनी रद्द करावे. तसेच आमदार क्षीरसागर यांच्या व्यक्तीगत चारित्र्यावर बाधा येऊ नये व पोलिसांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, दिलीप देसाई, बाबा पार्टे, दिलीप माने, सुभाष देसाई, चंद्रकांत बराले, प्रशांत कुरणे, अशोक पोवार, बाबा महाडिक आदी उपस्थित होते.