विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षातून ६ वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता. पण, काँग्रेस निलंबनाची कारवाई केल्याने अद्यापही नाराज आहात का? यावर आमदार सत्यजीत तांबेंनी भाष्य केलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी शासकीय विश्रागृहात चर्चा केली. त्यानंतर सोमवारी ( १७ एप्रिल ) कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत निवडणुकीवेळी झालेली कारवाई आणि भविष्यातील वाटचालीबद्दल भाष्य केलं.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी अयोध्येतून संयम शिकला नाही आणि आप्पासाहेबांकडून…”, ‘त्या’ घटनेवरून ठाकरे गटाचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र

सत्यजीत तांबे म्हणाले, “माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झाले नाहीत. तसेच, कोणाशी मतभेद असण्याचं कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हा काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केलं. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली.

“मात्र, पिढ्यां-पिढ्या आम्ही काँग्रेसमध्ये काम करणारी लोक आहोत. आमच्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्षे होत आहेत. मी सुद्धा २२ वर्ष काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक चळवळीत काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला ढकलून देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला. त्याविरोधात आमची लढाई होती आणि ती अजूनही चालूच आहे,” असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल. पण, अद्यापही कोणीही चर्चेसाठी बोलावलं नाही,” असं मत सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं आहे.