साताऱ्यात गणपती विसर्जन आणि डॉल्बीवरुन सुरु असलेल्या वादात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उडी घेतली असून अटी शिथील करुन डीजेला परवानगी दिली जावी अशी मागणी केली आहे. सोबतच जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी असंही ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांची व्यवस्था करावी तसंच डॉल्बीबाबत अटी शिथील करत डीजेला परवानगी द्यावी, मात्र सरसकट बंदी घालू नये असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे गणेशोत्सवामध्ये डॉल्बी वाजवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेत सातारा शहरातील गणपतीचं मंगळवार तळ्यात विसर्जन करणार असल्याची भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.

न्यायलयाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाचे अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे. मी पळपुटा नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहणार आहे असेही उदयनराजेंनी सांगितले.

एकीकडे उदयनराजे डॉल्बी वाजवण्यावर ठाम असताना दिसत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनीही डॉल्बी वाजवू देणार नाही असे स्पष्ट केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांची डॉल्बीविरोधी भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली होती. गणेशोत्सव शांततेमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा केला जाईल अशी आशा नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla shivendrraje bhosale demands permission for dj ganpati immersion
First published on: 15-09-2018 at 10:55 IST