शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मागील चार दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक देखील बंडखोर आमदारांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. नाशिकमध्ये काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर शाई फासून निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटर खात्यावरून शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत, पण हा निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर का आली, ते तुम्ही समजून घ्यावं.” संबंधित व्हिडीओ भायखळा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यामिनी जाधव यांचा आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही समजू शकतो. कारण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. यापुढेही शिवसैनिक राहणार. पण आम्ही हा निर्णय का घेतला हे समजून घेणं गरजेचं आहे.”

हेही वाचा- राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

व्हिडीओत यामिनी जाधव पुढे म्हणाल्या, “गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं आहे. कॅन्सर झाल्याचं जेव्हा मला आणि कुटुंबाला समजलं, तेव्हा सर्व कुटुंब तुटलं. कॅन्सर झाल्याची माहिती आपल्या पक्षाला द्यायला हवी, म्हणून यशवंतराव जाधवांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना याची माहिती दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अशी अपेक्षा होती की, शिवसेनेचे काही नेते माझ्या घरी येतील, विचारपूस करतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत. हीच गोष्ट मोठी हेलावणारी होती. मी स्वत: कॅन्सरच्या नावानं कोलमडून गेली होती. त्याकाळात भायखळा विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी खूप साथ दिली. त्यांचे आजही आभार मानू इच्छिते.”

हेही वाचा- एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना? राजकीय नाट्याला वेगळं वळण

“पण शिवसेनेच्या प्रमुख नेत्याकडून माझी विचारपूस केली जाईल. एक आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या कुटुंबाला मिळेल. अशी माझी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही.ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या कोणत्याही नेत्यांनी माझी विचारपूस केली नाही. मी स्वत: २०१२ पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाल्याचं पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींना रुग्णालयात जाऊन भेटल्याचंही मी पाहिलं आहे. त्यांच्या पत्नींप्रमाणे माझी अगदी मरणाशय्य अवस्था होणं गरजेचं होतं का? मग माझ्या पक्षातील नेते मला बघायला आले असते? ही गोष्ट मनात खलत होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझं कुटुंब सात-आठ महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात कुणाचं मार्गदर्शन, आधार, सूचना मिळाल्या नाहीत. आम्ही दोघंच हातपाय मारत होतो. या सर्व परिस्थितीमुळे आम्ही या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. हा निर्णय घेणं, सोपं नव्हतं. बऱ्याच दिवसांपासूनची ही प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होतायत. एक मात्र नक्की आहे की, यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. कॅन्सरच्या अवस्थेत भायखळा विधानसभेतील शिवसैनिकांनी आम्हाला जसं समजून घेतलं, त्याचं शिवसैनिकांनी आता आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी करणार नाहीत. काहीतरी त्यामागे कारण असेल, ते शोधणं गरजेचं आहे,” असंही त्या म्हणाल्या.