रायगड जिल्ह्याच्या इर्शाळवाडी येथील घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. दरड कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर एनडीआरएफची पथकं घटनास्थळी रवाना झाली आहे. मागील अनेक तासांपासून इर्शाळवाडी येथे बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रायगड दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याच्या घटनेबद्दल राज ठाकरेंनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त लोकांना आणि नातेवाईकांना महाराष्ट्र सैनिकांनी मदत करावी, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर प्रशासनाच्या कारभारावरही राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

हेही वाचा- “माझा वाढदिवस साजरा करू नका”, इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची घोषणा!

राज ठाकरे ट्वीटमध्ये म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे, असं सांगण्यात येत आहे. यातून लोक सुखरूप बाहेर पडावीत, इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती. पण आता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात? ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे यावर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.”