शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात सर्व शिवसैनिकांमध्ये सध्या उत्साह संचारलेला आहे. मात्र शिवसेना-भाजपमधल्या या सत्तासंघर्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेच्या निर्णयाची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे, ज्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावरही चांगलंच तोंडसुख घेतलं. आपल्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेवर लाथ मारण्याच्या घोषणेला नाटकाची उपमा दिली आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोटावर बसून सत्ता सोडू का? अशी धमकी देताना दाखवले आहेत.

अवश्य वाचा – औरंगाबादेत बाळासाहेबांच्या फोटोसमोर नारळ फोडून शिवसैनिकांचा श्रीगणेशा!

शिवसेना आणि भाजप हे पक्ष गेल्या साडेतीन वर्षांपासून सत्तेत आहेत. मात्र सत्तेत सहभाग घेऊनही शिवसेना कायम भाजपविरोधी राजकारण करत राहिलेली आहे. कित्येकवेळा सत्तेवर लाथ मारण्याची घोषणा करुनही शिवसेना प्रत्यक्षात तसं काहीच करत नाही. याच कारणामुळे शिवसेना सत्तेची लालची आहे असा आरोप मनसेसह अन्य विरोधी पक्षांनी केला आहे.

अवश्य वाचा – गाय मारण्याप्रमाणेच थापा मारणंही पाप – उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

शिवसेनेच्या सत्तेमधून बाहेर पडण्याच्या घोषणेवर भाजपने सध्या सावध पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे. शिवसेनेला आगामी निवडणूक स्वतंत्र लढवायची असल्यास यात त्यांचंच नुकसान असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या शिवसेना-भाजपचं युती सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यातच राज ठाकरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेमुळे आता शिवसेना यावर काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.