अलिबाग – राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावर समाज माध्यमांवर टीका टिप्पणी केली म्हणून, मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आता महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी समाज माध्यमांवर रोजगार हमी उत्पादन मंत्री गोगावले यांच्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली होती. या गोष्टीचा राग मनामध्ये धरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांच्या चवदार तळे येथील पंकज प्रेम मास्टर व फोटो स्टुडिओ या दुकानात येऊन पंकज उमासरे यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या ठोशाने मारहाण केली होती. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महाडच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह रोहन धेडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर, भावड्या सुर्वे, निरज खेडेकर, सुनंदा पवार यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे तपास करीत आहेत.