औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर असं करण्याला केंद्राने मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या नावाला विरोध दर्शवला आहे. संभाजी नगर या नावाला पाठिंबा देत मनसेने संभाजी नगरने मोर्चा काढला . त्यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. या मोर्चाला संमती मिळालेली नव्हती तरीही हा मोर्चा निघाला. संभाजी नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पोलिसांनी तातडीने धाव घेत बॅरिकेट्स लावली आहेत. तसंच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येतं आहे. या ठिकाणी मोर्चा सुरू आहे तसंच कार्यकर्त्यांची घोषणाबाजीही सुरू आहे. कुणी कितीही अडवा आम्ही मोर्चा काढणारच असं मनसेचे कार्यकर्ते म्हणत आहे. संभाजी नगर येथील संस्थान गणपती मंदिराबाहेर सध्या ही घडामोड घडते आहे.
मोर्चा काढू दिला जात नाही ही शोकांतिका
इम्तियाज जलील यांना जर कँडल मार्चसाठी संमती मिळू शकते तर मग आम्हाला का मिळत नाही? असे कित्येक इम्तियाज जलील आले आणि गेले आम्ही त्याला गिनतीतही धरत नाही. छत्रपती संभाजी नगर हे नामकरण करण्याला संमती मिळाली आहे. मात्र आम्हाला समर्थनार्थ मोर्चा काढू दिला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असंही काही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश महाजन यांनी काय म्हटलं आहे?
संभाजीनगर हे नाव देण्यास संमती मिळाली याचा आम्हाला आनंद झाला आहे. त्या आनंदाप्रीत्यर्थ आम्ही हा मोर्चा काढला आहे. आम्हाला पोलीस अडवत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना अडवणं आणि धरपकड करणं चूक आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. आम्ही शासन निर्णयाच्या बाजूने आम्ही चाललो आहे तरीही आम्हाला अडवलं जातं आहे? शासनाच्या भूमिकेवर आता आम्हाला संदिग्धता आहे. आम्हाला संमती का दिली का गेली नाही? आम्ही आनंद साजरा करण्यासाठी संमती का दिली गेली नाही? असाही प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.
नेमकं काय घडलं?
औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्याला केंद्राने संमती दिली आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा निघाला. मात्र या मोर्चाला संमती नाही त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत अनेक कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. पाहता पाहता या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. आता हा मोर्चा कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.