उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात केलेलं भाषण चर्चेत आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि भाजपा तसंच नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावरुन त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. यानंतर मनसेचे नेते शांत बसलेले नाहीत. आधी संदीप देशपांडे आणि त्यानंतर आमदार राजू पाटील या दोघांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“या निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. यावर आता आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दादू असं म्हणत टीका केली आहे.

हे पण वाचा- “काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण…”, उद्धव ठाकरेंच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार

काय आहे राजू पाटील यांची पोस्ट?

कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत ? #लब्बाडलांडगंढ्वांग_करतंय अशी पोस्ट राजू पाटील यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंचं एक भन्नाट व्यंगचित्रही त्याबरोबर पोस्ट केलं आहे. ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही”, अशा खोचक शब्दांत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेने उद्धव ठाकरेंच्या टीकेला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. बिन-शर्ट बोलणारे उद्धव ठाकरे हे विसरलेत कि लोकसभेत मराठी माणसाने त्यांची पॅन्ट काढली आहे !! फक्त आणि फक्त मुस्लिम मतांमुळे जिंकलेले उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वंशज असू शकतात का ?? अशी पोस्ट मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनीही केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जरी एकमेकांचे भाऊ असले तरीही त्यांच्यातून विस्तव जात नाही हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेही टोलेबाजी करत असतात. आता उद्धव ठाकरेंनी जी टीका केली त्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.