विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपल्याचं गेल्या आठवड्याभरात पाहायला मिळालं. मात्र, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्क्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे सभागृहात दोन्ही बाजंमध्ये खडाजंगी झाली. या वक्तव्याचा परिणाम म्हणून अध्यक्षांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असताना जयंत पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करत मनसेनं खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

नेमकं विधानसभेत घडलं काय?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत गुरुवारी तुफान गदारोळ झाला. सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणी केलेल्या एसआयटी चौकशीच्या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दिला आणि विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू देण्याची विनंती अजित पवार करत असतानाच जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असं वक्तव्य केलं. यानंतर सभागृह तहकूब करून अध्यक्षांनी आपल्या दालनात दोन्ही बाजूच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर सभागृह सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांचं निलंबन केल्याचा निर्णय अध्यक्षांनी जाहीर केला.

…आणि भास्कर जाधवांनी दिली दिलखुलास दाद!

यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह जयंत पाटील माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी मिश्किलपणे बोलताना जयंत पाटील यांनी “आमची शिवसेना आहे. राष्ट्रवादीची शिवसेना आहे”, असं विधान केलं. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलखुलासपणे हसत दादही दिली.

“तुम्ही SIT चं रेशन केलंय, मागेल त्याला..”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “तोंडावर पडाल”!

दरम्यान, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “पोटातलं ओठांवर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना – जयंत पाटील..भास्कर जाधव यांनीही मान्य केलं आहेच!” असं या ट्वीटमध्ये गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवरून आता टोलेबाजी सुरू झाली आहे.