गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही राज्यातील शिंदे सरकारवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकास्र सोडलं. त्यामुळे एकीकडे संजय राऊतांच्या सुटकेमुळे ठाकरे गट अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे मनसेकडून संजय राऊतांना लक्ष्य करत खोचक ट्वीट करण्यात आलं आहे. त्याचवेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कालचा पिंजऱ्यातला वाघ…”

संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ‘टायगर इज बॅक’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात येत होत्या. खुद्द आमदार आदित्य ठाकरे यांनीही ‘संजय राऊत नॉट आऊट’ म्हणत आगामी काळात संजय राऊत पुन्हा आक्रमक होण्याचेच सूतोवाच दिले. मात्र, असं असलं तरी राज ठाकरेंच्या मनसेनं मात्र संजय राऊत तुरुंगातून आल्यानंतर काहीसे मवाळ झाल्याची टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यासंदर्भात ट्वीट करून संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. “काल पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता”, असं आपल्या ट्वीटमध्ये गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांना खोचक टोला!

दरम्यान, या ट्वीटमध्ये गजानन काळे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अप्रत्यक्षपणे सूचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. ‘राजकारणातील अलका कुबल’ असा उल्लेख काळे यांनी केला असून तो थेट सुषमा अंधारे यांनाच टोला असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांच्या सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरूनच काळे यांनी अंधारेंना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. “सूर बदले हैं जनामब के..राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील. लवंडे जोमात. मातोश्री कोमात”, असं या ट्वीटमध्ये गजानन काळे म्हणाले आहेत.

दरम्यान, या ट्वीटनंतर पुन्हा एकदा ठाकरे गट विरुद्ध मनसे असा कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mocks sanjay raut shivsena sushma andhare on bail granted pmw
First published on: 10-11-2022 at 14:38 IST