राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मागील तीन महिन्यांत सहा भेटी झाल्या आहेत.महाराष्ट्रात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे येत्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाच महापालिकांवर दोघांचं एकमत झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंही आहे.
राज ठाकरेंना बरोबर घेण्यात कांग्रेसला रस नाही?
दरम्यान दुसरीकडे राज ठाकरे यांनी तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घेण्याला काँग्रेसने विरोध केल्याचे बोललं जात आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दुरावतील, असे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. त्यामुळे मनसेच्या संभाव्य समावेशावरून महाविकासआघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मोठे मतभेद उघड झाले आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याबद्दल भाष्य केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी माझी तक्रार आमच्या हायकमांडकडे केली आहे वगैरे याची काही मला कल्पना नाही. मनसेसंदर्भातला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत त्याबाबत सर्वपक्षीय पक्षांना बोलवलं होतं. भाजपालाही निमंत्रण पाठवलं होतं. बिहार निवडणूक आणि याचा तसा काही प्रश्न नाही. मतचोरीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. त्यावर सगळेच पक्ष तुटून पडत असतील तर चांगलंच आहे. आमचे मित्र पक्ष त्यावर बोलत असतील आणि इतरांना बोलवत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या मनसेबाबत कुठलाही प्रस्ताव नाही
राज ठाकरेंच्या मनसेबाबत सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबत चर्चा होतील. त्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देता येईल. असा कुठलाही प्रस्ताव नसल्याने याबाबत आत्ता काही बोलणं योग्य ठरणार नाही असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज ठाकरेंनी गाजवली मविआची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागचे दोन दिवस एकत्र दिसून आले. आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यावर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद गाजवली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी ही पत्रकार परिषद गाजवली यात शंका नाही.