काही दिवसांपूर्वीच पुण्यात वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यामुळे मोठी राजकीय चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी पुण्यातील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीका करत पक्षातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेच्या पुण्यातील संघटनेमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून आलं. मात्र, त्यापाठोपाठ आता वसंत मोरेंची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. यासंदर्भात वसंत मोरेंनी आज माध्यमांशी बोलताना सूचक विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरे यांनी यावेळी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. “पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेतोय. लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात. पण ते निवडताना पुण्याचं हित झालं पाहिजे त्या दृष्टीने पावलं टाकतोय”, असं ते म्हणाले.

“मी मविआकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीयेत तर जिंकायच्याही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवर असणं गरजेचं आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईन असं मला वाटतं”, असं वसंत मोरेंनी नमूद केलं.

वसंत मोरेंचं ठरलं? पोस्ट करत म्हणाले, “एक नवी दिशा..”

एकतर्फी निवडणुकीचा वसंत मोरेंना विश्वास!

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होईल, यावर वसंत मोरेंनी यावेळी विश्वास व्यक्त केला. “आजपासून निवडणुकीला ५५ दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू”, असं ते म्हणाले. तसेच, दुसऱ्या पक्षात जाण्याआधीच पक्ष सोडल्याबाबत विचारलं असता “माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर टोला!

यावेळी बोलताना वसंत मोरेंनी भाजपा नेते व पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. “वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले, तर त्यानं आम्हाला फारसा फरक पडणार नाही”, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केल्याबाबत विचारणा केली असता वसंत मोरेंनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “तसा फरक पडला नसता तर २०२२ ला ते मला म्हणालेच नसते की तुम्ही भाजपात या. मॅरिएट हॉटेलमध्ये मला सकाळ समूहानं पुरस्कार दिला होता. तेव्हा उघडपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की तुम्ही भाजपात या, तुम्ही निवडून याल. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की माझ्या तिन्ही टर्म भाजपाविरोधात झाल्या आहेत आणि तिन्ही वेळा मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीनं काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवेल”, असं अप्रत्यक्ष आव्हानच त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं.