कोणत्या खताचा वापर करावा याच्या सल्ल्यासाठी विशेष अॅप
जमिनीच्या सातबारात मालकी, वहिवाटीची माहिती असते. पण जमिनीचे आरोग्य, पोषणमूल्यांची कुठे नोंदच नव्हती. आता जीपीएस प्रणालीद्वारे नकाशे बनवून त्या आधारे माती परीक्षण करण्यात येऊन त्या पद्धतीने आरोग्य पत्रिका तयार केली. याच्या अधारे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना पिकांसाठी खत वापराचा सल्ला दिला जाणार आहे.
२००५ हे वर्ष जमीन आरोग्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. प्रत्येक शेतकऱ्यास ‘मृदा आरोग्य पत्रिका’ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. कृषी अनुसंधान परिषदेकडे हे काम सोपविण्यात आले. त्यांनी भोपाळ येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सॉइल सायन्स’, माती परीक्षण व पीकप्रतिसाद योजना, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले. आता मृदा परीक्षणात देशात सर्वात आघाडीवर महाराष्ट्र आहे. विशेष म्हणजे मोबाइल अॅपचा पथदर्शी प्रकल्प राज्यातच राबविला जात आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर ही सर्वात मोठी समस्या आहे. विविध कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. आत्तापर्यंत मृदा तपासणी न करता कृषी शात्रज्ञ पिकांना किती रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा याच्या शिफारशी या सरासरी पद्धतीने करत. त्यामुळे जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांपकी नेमकी कशाची कमतरता आहे याचा विचार होत नसे. साहजिकच शेतकऱ्यांचा खर्च वाया जात असे. पण कृषी अनुसंधान परिषदेमार्फत देशातील १७८ जिल्ह्य़ांचे रासायनिक खते पीकप्रतिसाद मृदा नकाशे जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात आले. त्यानंतर राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषीविज्ञान केंद्रे व कृषी विभागाच्या वतीने मातीची तपासणी करण्यात आली. त्या आधारे शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य पत्रिका’ देण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामात सर्वात आघाडीवर महाराष्ट्र आहे. पुणे येथील राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्र (एनआयसी) यांनी मृदा नकाशे व तपासणी, पिकांच्या खत शिफारशी या आधारे एक मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत, त्यामुळे कोणत्या पिकांना कोणते घटक द्यावयाचे याचा सल्ला मिळणार आहे. मार्चपर्यंत ते उपलब्ध होणार आहे.
देशात सर्वप्रथम राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य पत्रिका’ मिळणार आहे. १७ पोषक तत्त्वांची त्यात माहिती असेल. मोबाइल अॅपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे आरोग्य व त्याआधारे खतांचा वापर याचा पिकनिहाय सल्ला मिळेल. जमिनीची ही कुंडली तयार करण्यासाठी राज्यात २९ प्रयोगशाळांमधून प्रत्येक गावातील जमिनीच्या प्रकारानुसार मृदा नमुने घेण्यात आले होते. शेतकऱ्यांना हे सर्व मोफत मिळणार आहे. – डॉ. अशोक कडलग, मृदा शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
देशात प्रथमच मृदा आरोग्याकडे लक्ष देण्यात आले आहे. जमिनीतील १७ पोषकतत्त्वांची मोफत तपासणी करून शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य पत्रिका’ देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खतांचा संतुलित वापर होईल. सहा पिकांकरिता सुरुवातीला शिफारशी केल्या जातील. त्यामुळे संशोधन पद्धतीतही बदल होतील. जमिनीचा पोत त्यामुळे सुधारून अन्नसुरक्षेला हातभार लागेल. – डॉ. प्रदीप डे, वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली.
शेतीक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून एनआयसीने अनेक संगणक प्रणाली विकसित केल्या आहे. मृदा आरोग्याचे पथदर्शी काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे राहत आहे. यापूर्वी भोपाळच्या मृदा संशोधन संस्थेला संगणक प्रणाली विकसित करून दिली. आता अॅप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये माहिती अद्ययावत करण्याचे काम भोपाळची संस्था, राज्यातील चारही कृषी विद्यापीठे करत आहेत. – गिरीष फेगडे, तांत्रिक संचालक, राष्ट्रीय माहिती केंद्र(एनआयसी), पुणे.
