लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७७ मध्ये देशात परिवर्तन झाले. तसेच परिवर्तन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात घडेल, अशी स्थिती असल्याचा दावा भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला.
येथे शनिवारी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. लातूरचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड, संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष गोिवद केंद्रे उपस्थित होते. रमेश कराड यांच्या निवासस्थानी ही पत्रकार बैठक झाली. मुंडे म्हणाले की, देशात प्रथमच एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र असून, विविध सर्वेक्षणांतून ही स्थिती समोर येत आहे. मोदी यांना प्रचार समिती प्रमुख केले, तेव्हा त्यांचा आलेख १८ टक्के होता. सध्या तो ४३ टक्के आहे व राहुल गांधींचा आलेख २२ वरून १३ टक्क्यांवर घसरला आहे. राज्यात महायुतीची स्थिती भक्कम असून ४८ पकी ३३ पेक्षा अधिक जागा येतील, असा दावाही त्यांनी केला.
महायुतीत आता सहाजण आहेत. राज्यात सत्तेवर आल्यास टोलमुक्त महाराष्ट्र, एलबीटी रद्द करू, शेतकऱ्यांचे वीजबिल ५० टक्के करू व शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करू, अशा घोषणा आम्ही केल्या आहेत. कृषीक्षेत्रात महाराष्ट्राचा निचांक आहे. राज्यातील आघाडी सरकारने १५ वर्षांपासून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करू व मराठा समाजाला आरक्षण देऊ, ही आश्वासने दिली. मात्र, त्याची पूर्तता केली नाही. शिवछत्रपतींचे स्मारक करू शकलो नाहीत, याबद्दल सरकारला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत मुंडे यांनी टीका केली. मराठा समाजाचा आघाडी सरकारने विश्वासघात केला. आपले सरकार सत्तेवर आल्यास या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.
गेल्या वेळी लातूरची जागा केवळ ७ हजार मतांनी गमवावी लागली. तेव्हा विलासराव होते व त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या वेळी लातूरची जागा भाजपच सहज जिंकेल, असा दावा त्यांनी केला. बीडची जागा २ लाख मतांनी मी जिंकेन, असा विश्वास व्यक्त करताना राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांत आपण प्रचाराला जाऊन आलो. बीडमध्येच मला गुंतवून ठेवण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला मी पुरून उरेन, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
‘अनिल गोटे आपले मित्रच’
लोकसंग्राम पक्षाचे प्रमुख अनिल गोटे यांनी आपल्यावर टीका केली, याबद्दल बोलताना मुंडे म्हणाले की, त्यांना उमेदवारी दिली जावी, या साठी मी आग्रही होतो. मात्र, राज्यात २६ जागांसाठी ५०० जण इच्छुक असल्यामुळे सगळय़ांनाच न्याय देता येत नाही. लोकसंग्राम पक्ष महायुतीत सामील करून घेण्याची आपली इच्छा आहे. गोटे आपल्यावर नाराज असले, तरी आपण त्यांच्यावर नाराज नसल्याचे मुंडे म्हणाले.
‘कल्पना गिरी प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी’
काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या गूढ मृत्यूवरून राज्यात महिला असुरक्षित आहेत. बिहार व उत्तरप्रदेशपेक्षाही महाराष्ट्राची स्थिती वाईट आहे, अशी टीका करून कल्पना गिरी हत्येची सीबीआय चौकशी व्हावी व दोषींना फाशी दिली जावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.