scorecardresearch

सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला मोहित कंबोज यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दाऊदचा फ्रंट मॅन असलेल्या नवाब मलिकांचा…”;

मोहित कंबोज यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

mohit kamboj criticized supriya sule
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून देवेंद्र फडणवीसांना जर गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी माध्यमाशी बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. असे ते म्हणाले. दरम्यान, या वादात आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उडी घेतली असून त्यांनी यावरून सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – संयोगीताराजेंच्या आरोपांवर संभाजीराजेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले, “नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला…”

काय म्हणाले मोहित कंभोज?

मोहित कंबोज यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्र सोडलं. १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी असेलल्या लोकांशी जमीन व्यवहारात करणाऱ्या आणि दाऊद इब्राहिमचा फ्रंट मॅन असलेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास तुमची काय असमर्थता होती? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच नैतिकदृष्ट्या ज्येष्ठ नेत्या म्हणून तुम्ही अपयशी ठरला आहात, अशी टीकाही त्यांनी केली.

नेमकं काय घडलं?

संभाजीनगरमधील दंगल आणि संजय राऊत यांनी मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – संभाजीनगर आणि मालवणी येथील घटनांवर शरद पवारांनी पहिल्यांदाच केल भाष्य; म्हणाले…

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पद पाच वर्षं मी सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही”, असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 21:39 IST

संबंधित बातम्या