टाळेबंदीच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीच्या बाहेरील उद्योग आणि कारखाने सुरू करून आर्थिक गाडा हाकण्याच्या केंद्र व राज्य सरकारांच्या निर्णयानुसार राज्यात काही प्रमाणात उद्योगांचे चाक हलले आहे. १३ हजारांपेक्षा जास्त उद्योग सुरू झाले असून, यात ७० हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत.
टाळेबंदी अंशत: शिथिल करताना महापालिका किंवा नगरपालिका हद्दीबाहेरील वा प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योगांना परवानगी देण्याची योजना होती. यासाठी ऑनलाइन परवानगी देण्याची तरतूद होती. सुरुवातीला उद्योजकांनी शासनाने टाकलेल्या अटींबाबत नापसंती व्यक्त के ली होती. परंतु काही गैरसमजातून ओरड झाली होती. उलट जेवढे अर्ज आले तेवढे मंजूर करण्यात आल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांचे म्हणणे आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक २३१० उद्योग सुरू करण्यास परवानग्या देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात ८७ उद्योगच सुरू झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक १६००च्या आसपास उद्योग सुरू झाले आहेत. पालघर उद्योग वसाहतीत ६०९ परवानग्या देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात २००च्या आसपास कारखाने सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्य़ात १७४८ अर्ज दाखल झाले होते व साऱ्यांना परवानग्या देण्यात आल्या. पण फक्त ४२ उद्योगच सुरू झाले.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील बजाज आणि अॅण्डुरन्स या कंपन्यांनी दोन सत्रांत उत्पादन सुरू केले आहे. दुचाकी व तीन चाकी उत्पादनातील अग्रसेर कंपन्यांनी दक्षिण आफ्रिकेसह निर्यातदारांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्य़ात करोनाची वाढ लक्षात घेता फारसे उद्योग सुरू झालेले नाहीत. औरंगाबाद शहरातील २८ कंपन्यांनी उद्योग सुरू केला असून १ हजार ८५८ कामगारांनी हजेरी लावली.
नाशिक : नाशिक जिल्ह्य़ात तीन हजार अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी १६०० उद्योग सुरू झाले आहेत. महिंद्रा, एबीबी, ग्लॅक्सो स्मिथलाइन, जिंदाल सॉ मील, मायलॉन, हिंदुस्तान युनिलिव्हर आदींचा सुरू झालेल्या उद्योगांमध्ये समावेश आहे. शासनाने कामगारांच्या वाहतुकीसाठी मिनी बस वा तत्सम वाहनांना परवानगी दिलेली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांना परवानगी नाही. या वाहनांना देखील परवानगी द्यावी, अशी उद्योजकांची मागणी आहे.
कोल्हापूर : उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दर्शवला असल्याने कोल्हापुरात सुमारे ८०० उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याची महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. ही संख्या लक्षणीय असली तरी प्रत्यक्षात उद्योग सुरू होण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोठय़ा कंपन्यांनी कामकाज सुरू केले आहे. औद्योगिक वसाहतीत तुरळक वर्दळ दिसते.
निर्यातक्षम उत्पादने आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या बनवणारे कारखाने यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. इतर उद्योजकांनी मात्र शासनाच्या नियम व अटी याच्या कडक निर्बंधामुळे कारखाने सुरू करण्याचा विचार सोडून दिला आहे.
नियमाचे काटेकोरपणे पालन करीत उद्योग सुरू ठेवणे हे उद्योग सुरू केलेल्या उद्योजकांसमोर आव्हान असणार आहे. ‘उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दर्शवली असली तरी बहुतांशी उद्योजकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्योग सुरू होण्याचे प्रमाण हे तुलनेने खूपच कमी आहे,’ असे कोल्हापूर फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष, उद्योजक सचिन पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
अलिबाग : रायगड जिल्ह्य़ात ६१२ कं पन्या सुरू झाल्या आहेत. यात औषधे, रासायनिक, पोलाद, जीवनावश्यक वस्तू, पॅके जिंग, पेट्रोके मिकल आणि पोलाद उद्योगांचा समावेश आहे.
श्रीरामपूर : नगर जिल्ह्य़ात एकू ण ३५ हजार छोटे-मोठे उद्योग असले तरी शासनाच्या धोरणानुसार ८५१ कारखानदारांनी टाळेबंदीच्या काळात उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज दाखल के ले होते. यातील बहुतांशी उद्योग सुरू झाले असून, १० हजारांच्या आसपास कामगारांना रोजगार मिळाला. बहुतांशी उद्योगांमध्ये कार्यालयीन कामकाज, साफसफाई आणि दुरुस्तीचीच कामे सध्या सुरू आहेत. नव्याने उत्पादन सुरू झालेले नाही.
१३ हजारांपेक्षा जास्त अर्ज मंजूर
टाळेबंदीच्या काळात उद्योग सुरू करण्यासाठी दाखल झालेल्या एकू ण अर्जापैकी १३,४४८ ऑनलाइन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी साडेतीन हजारांच्या आसपास उद्योग सुरूही झाले आहेत व यामध्ये सुमारे ७० हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे १०१६१ उद्योग सुरूच आहेत. येणाऱ्या सर्व अर्जावर तातडीने निर्णय घेऊन परवानग्या दिल्या जात आहेत.
– डॉ. पी. अनबगलन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ
* परवानगीसाठी एकूण अर्ज दाखल – १३,४४८
* परवानगी मंजूर – १३,४४८ (सर्व अर्ज मंजूर)
* प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले – ३१८६
*कामगारांची संख्या – ७० हजारांच्या आसपास
* कामगारांची ये-जा करण्यासाठी वाहनांना परवाने – २०६९
नागपूर : नागपूर जिल्ह्य़ात तीन औद्योगिक वसाहतींमध्ये ७०, अमरावती जिल्ह्य़ात ११ तर चंद्रपूर जिल्ह्य़ात सिमेंट कारखान्यांसह चार तर अकोला जिल्ह्य़ात ११२ उद्योगांनी अंशत: काम सुरू केले. विदर्भात एकू णच प्रतिसाद कमीच आहे.
सांगली : सांगली जिल्ह्य़ात मोठय़ा व लघुउद्योगांची एकू ण संख्या ही १५ हजारांच्या आसपास आहे. यापैकी ३४० उद्योजकांनी ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल के ले होते. त्यातील आजतागायत ७० उद्योग सुरू झाले आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्य़ात सुमारे ३५ हजारांच्या आसपास कारखाने असून त्यात सूतगिरण्या, यंत्रमाग, विडी बनविण्याच्या कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्य़ात १६२ अर्ज दाखल झाले असून, प्रत्यक्षात १९ कारखानेच सुरू झाले आहेत. विडी कारखाने आणि यंत्रमाग बंदच आहेत.
