रत्नागिरी – ‘माता न तू वैरिणी’ या म्हणी प्रमाणे रत्नागिरी येथील पारसनगर कारवांचीवाडी येथे आईनेच एका वर्षाच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून ठार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  हुरेन असिफ नाईक (वय १ वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत बाळाचे नाव आहे. तसेच  शाहीन आसिफ नाईक (३५, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे.  शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेने रत्नागिरीत चांगली खळबळ उडाली आहे.  या घटनेबाबत नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली शाहीन आसिफ नाईक ही रत्नागिरीतील पारस नगर येथे वास्तव्यास होती.

या घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेत घटनेचा पंचनामा करून  बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.  मात्र, हत्येमागील नेमके कारण काय आहे? आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा नाही?, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.