आज जागतिक मातृदिन. आजच्या दिवशी आईचा सन्मान करत तिच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. मातृदिनानिमित्त आई विषयी प्रेम व्यक्त केलं जातं. परंतु, आजच्या दिवशी आईची नितांत गरज असणाऱ्या दीपाली आणि भाऊ ओंकार यांना मात्र त्यांची आई कायमची सोडून गेली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीसमोर आईचा गळा घोटून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात घडली. या धक्कादायक घटनेनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ती मुलं आई वाचून पोरकी झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

….दहा वर्षीय दीपाली आणि आठ वर्षीय ओंकार या दोघांना कदाचित आपल्यापासून आई वंदना ही कायमची दूर जाणार हे क्वचित देखील माहीत नव्हतं. तो काळा दिवस उगवला आणि त्यांच्यापासून त्यांची गोड आई देवाने कायमची हिरावून घेतली. वार गुरुवार वडील उत्तम जाधव हे नेहमीच मुलांसह पत्नी वंदनाला मारहाण करत. दुपारी उत्तम जाधव हे घरी दारू पिऊन आले. त्यांनी आपल्या पोटच्या मुलांना जेवण करू दिले नाही. पत्नीला मारहाण करत शिवीगाळ केली आणि पुन्हा ते बाहेर गेले…

वडीलांविषयी प्रत्येक मुलांना आपुलकी असते, अशीच भाबडी आशा ओंकार आणि दीपाली बाळगून होते. संध्याकाळी वडील खाऊ घेऊन येतील या आशेने दोघे असायचे, प्रत्यक्षात मात्र कधीच असं झालं नाही. त्या रात्री देखील वडील उत्तम हे दारू पिऊन आले. आई आणि त्यांच्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. आईने दोन्ही मुलांना शांत झोपी घातलं. आई वंदनाला हे माहिती नसेल की यापुढे मुलांना झोपी घालायला स्वतः ती नसेल. घरातील छोट्या स्नानगृहात वंदना भांडी घासत होती. तेवढ्यात हातात वायर घेऊन पती उत्तमने बेसावध असलेल्या वंदनाचा गळा घट्ट आवळला, आवाजाने मोठी मुलगी दीपाली जागी झाली. ती पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. दारूच्या नशेत असलेला उत्तम घाबरून बाहेरून घराची कडी लावून तो पळून गेला.

आई शेवटचा श्वास घेत होती, आपली दोन्ही मूल तिच्यासमोर हंबरडा फोडत होती. मात्र, ऐरवी आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणारी वंदना निपचित पडलेली होती. वंदना बेशुद्ध झाली…घरातून दोन्ही मुलांनी शेजारील काकांना मोठमोठ्याने आवाज दिला, सर्वजण जण आले दरवाजाची कडी उघडली. बेशुद्ध असलेल्या आईला काही अंतरावर राहणाऱ्या सख्या मामाने रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता, उपचारापूर्वीच वंदना जग सोडून गेली होती.

ओंकार आणि दिपलीला काही कमी पडू नये म्हणून वंदना दुसऱ्याच्या घरात धुणी-भांडी करत…आणि आलेल्या पैशातून आपल्या दोन मुलांची हौस भागवत, त्यांचं शिक्षणाचा खर्च देखील त्या त्याच पैशातून करत होत्या. उत्तमला दारूचे व्यसन होते, तो गवंडी काम करायचा. परंतु, घरात एकही पैसा आणत नव्हता. उलट वंदना यांनी केलेल्या पैशातून तो दारू पित होता. आज दोन्ही मुलं आई वाचून पोरकी झाली आहेत. तर वडील उत्तम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एवढ्या लहान वयात दिपालीला पोलीस ठाण्यात येऊन वडीलांविरोधात जबाब द्यावा लागतोय. सध्या त्यांचा सांभाळ मामा करत असून त्यांची आई दुरावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. वडिलांनी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी दोन्ही मुलांचा विचार करणं फार गरजेचे होतं. या धक्कादायक घटनेनंतर ओंकार आणि दिपालीला ‘आई’ हाक मारायला कधीच मिळणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mothers day 2019 special story from pimpri chinchwad
First published on: 12-05-2019 at 10:15 IST