राहाता: सन १९५२ पासून प्रलंबित असलेल्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पश्चिमेस अरबी समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचा सिंचनास फायदा होण्यासाठी ३० वळण योजनांच्या सुमारे ९० टीएमसी पाण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री आर. सी. पाटील यांच्याकडे शिष्टमंडळासह केली. मंत्री पाटील यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.
दुष्काळी गावांतील सिंचनासाठी याशिवाय गोदावरी खोरे तुटीचे असल्याने या गोदावरी, प्रवरा, मुळा कालव्यांच्या लाभक्षेत्रात शेती आणि बिगर सिंचनाचे पाणी कमी पडत आहे. ही गरज भागविण्यासाठी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील अरबी समुद्रास वाहून जाणारे, कोकणासह जवळपास ३०० ते ४०० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची गरज आहे. मात्र या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. याकडे निळवंडे कालवा कृती समिती आणि शेतकरी संघटनेने खासदार वाकचौरे यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यानुसार दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेत निवेदन दिले.
शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे नानासाहेब जवरे, निळवंडे कालवा कृती समितीचे गंगाधर रहाणे, सचिव कैलास गव्हाणे, नानासाहेब गाढवे, उत्तम जोंधळे, विलास गुळवे, तानाजी शिंदे, सौरभ शेळके, महेंद्र सोनवणे, बाळासाहेब थोरात, दत्तात्रय थोरात, माजी उपसरपंच विजय थोरात, विजय शिंदे आदींचा समावेश होता.
भोजापूर धरणात पाणी सोडणार
दरम्यान या योजनेत संगमनेरमधील दुष्काळी भागातील साकूर, मुळा नदीच्या लाभक्षेत्रातील आणे, तळेगाव दिघे, नान्नज, तिगाव, करुले आदी भागाला भोजापूर धरणात पश्चिमेचे अतिरिक्त निर्माण होणारे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-खासदार भाऊसाहेब वाकचौरे