अहिल्यानगर: विखे कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना लाल दिवा मिळू शकतो, असा आशावाद खासदार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील आमचा उठाव जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्कारणी लागला, अशीही टीका त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
आमदार लंघे पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शिरसगाव (ता. नेवासा) येथे आज, बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार भुमरे बोलत होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे, पंचगंगा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा प्रभाकर शिंदे, काशिनाथ नवले, सिद्धांत नवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कपिल पवार, किसनराव गडाख, नितीन देसरडा, ऋषिकेश शेटे, दत्तूनाना पोटे, हरिभाऊ लंघे, डॉ. तेजश्री लंघे, सुरेश डिके, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. स्नेहल चव्हाण- घाटगे पाटील आदी उपस्थित होते.
भुमरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमचे पहिले मुख्यमंत्री केवळ ऑनलाइन दिसत होते. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आमच्यावर खोके-बोके आरोपही झाला. मात्र आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक राहून हातात झेंडे धरले, केसेस अंगावर घेतल्या आणि सत्ता आल्यावर मात्र आम्हाला मंत्रिपद देण्यापेक्षा खोके बहाद्दरांना दिली गेली. त्यावेळी ऑनलाइन दिसणारे मुख्यमंत्री आमच्याशी कधी बोललेच नाहीत. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आमचा उठाव जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्कारणी लागला.माजी खासदार विखे म्हणाले, खासदार भुमरे व आमदार लंघे पाटील ही राज्यातील अशी दोन उदाहरणे आहेत की सर्वसामान्य माणूसही खासदार आमदार होऊ शकतो.
सत्काराला उत्तर देताना आमदार लंघे पाटील म्हणाले, माझ्या स्वभावात कधीही बदल होणार नाही. सर्वसामान्य जनता आणि लाडक्या बहिणींमुळे मला ही संधी मिळाली. सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहून या संधीचे सोने करू. तुम्ही मला कधी भेटू शकता. पहिल्या आमदारांना भेटण्यासाठी सात पडदे ओलांडून जावे लागत होते. मला भेटण्यासाठी अशी गरज भासणार नाही.
लंघे यांना पाडण्याची काहींची सुपारी
आमदार लंघे पाटील यांनी वेळोवेळी मोठी राजकीय संधी आलेली असतानाही ती सोडून दिली. या संधीचा लाभ दुसऱ्यांनीच उठवत ते आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत लंघे पाटलांना काही जण मदत करण्यापेक्षा त्यांना पाडण्याची सुपारी घेऊनच रिंगणात उतरले होते, अशी टीकाही माजी खासदार सुजय विखे यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केली.
देवस्थानच्या ॲप घोटाळ्यावर आवाज उठवू
शनैश्वर देवस्थानच्या ‘ॲप’ घोटाळ्याबाबत आपण विधानसभेत आवाज उठवणार असून घोटाळेबाज लोकांसह मास्टरमाईंचे काळे बुरखे फाडणार असल्याचेही आमदार लंघे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.