सातारा : साताऱ्याच्या ‘आयटी पार्क’चा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे व त्यासाठी जागा हस्तांतरण प्रक्रिया लवकरच होईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील गोडोली येथील आयुर्वेदिक बागेमध्ये साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या स्मृतीस खासदार उदयनराजे भोसले व मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच यावेळी श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह महाराज उर्फ दादा महाराज ग्रंथालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते.

साताऱ्यात ‘आयटी पार्क’चा प्रस्ताव शासनाला दिला होता. ‘इन्फोसिस’च्या सुधा मूर्ती यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी त्यांच्या हुबळी गावी आयटी पार्क सुरू केले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कनेक्टिव्हिटीची समस्या झाली. पुण्यात जागा उपलब्ध नाही. सातारा औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध होण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र दिले आहे. एका खात्याची जागा दुसऱ्या खात्याकडे वर्ग करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. लवकरच साताऱ्यात आयटी पार्क करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

शक्ती आणि युक्तीच्या माध्यमातून सांगड घालण्याचे काम ग्रंथालयाच्या माध्यमातून झाले आहे. आयुर्वेदिक बागेमध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याचा नागरिकांना नक्की फायदा होईल. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना त्यांचे निधन होऊन ४६ वर्षे झाली. त्यांना अल्प आयुष्य मिळाले. त्यांनी शहराच्या बाबतीत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजवाड्याबाबत पाठपुरावा

साताऱ्याच्या जुन्या राजवाड्याला पुन्हा वैभव प्राप्त होणार का, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, त्यासाठी स्वतः पाठपुरावा करत आहे. या राजवाड्यात न्यायालय असताना त्याची देखभाल दुरुस्ती होत होती. त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत होते. ही वास्तू अत्यंत सुंदर आहे. मात्र, त्याचे कारंजे तोडले आहेत. ते पूर्वीसारखे होणार नाहीत. केंद्रशासनाकडे राजवाडा बाबत प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे. राजवाड्यात आत्ताचे संग्रहालय झाले असते तर ते अत्यंत चांगले झाले असते. इमारतीच्या रेड पोर्टमध्ये साऊंड अँड लाईट शो असतो. विदेशी पर्यटकांना ऐतिहासिक बाबींमध्ये रुची असते. त्या ठिकाणी अभ्यासिका मराठा इतिहासावर व्याख्यानाचे आयोजन करता येईल. मात्र, मध्यंतरी शासनाकडून उशीर झाला. राजवाड्याबाबत तातडीची पावले न उचलल्यास तो ढासळून जाईल, अशी भीती खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी ॲड. दत्ता बनकर यांनी गोडोली येथील आयुर्वेदिक बाग आणि ग्रंथालयबाबत माहिती दिली. यावेळी उदयनराजे समर्थक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.