अहिल्यानगर: पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी २ जुलै ते १३ जुलैदरम्यान एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून एकूण ४०० एसटी बसेस रवाना केल्या जाणार आहेत. त्यामध्ये नगर विभागाच्या २५०, धुळे विभागाकडून ७५ व जळगाव विभागाच्या ७४ एसटी बसचा समावेश. सर्व एसटी बस तारकपूर बसस्थानकावरून सुटतील, असे महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
याशिवाय प्रत्येक गावातून मागणी आल्यास गावातून पंढरपूरला जाण्यासाठी व पंढरपूरहून गावात येण्यासाठी थेट बस उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी गावापासूनचे भाडे आकारण्यात येईल, असेही एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
आषाढी वारीसाठी भाविकांच्या दृष्टीने २ जुलै, सप्तमी (आषाढी यात्रेची सुरुवात), ३ जुलै अष्टमी, ४ जुलै, नवमी (रिंगण सोहळा), ५ जुलै (दशमी), ६ जुलै, एकादशी (मुख्य दिवस) व १० जुलै, पौर्णिमा असे महत्त्वपूर्ण दिवस आहेत. यासाठी संबंधित आगारप्रमुखांची यात्राप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानक प्रमुख त्यांना त्यासाठी मदत करतील.
शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, आगाराच्या बसेस माहीजळगाव मार्गे पंढरपूरकडे जातील. पंढरपूर येथे विठ्ठल कारखाना यात्रा केंद्रावर शेड क्रमांक ३ मध्ये नगर विभागाची शेड असणार आहे. माहीजळगाव येथे महामंडळाने बस बिघाड दुरुस्ती पथक ठेवले आहे.
तारकपूर आगारातून ४०, शेवगाव २०, जामखेडमधून १८, श्रीरामपूर २३, कोपरगाव ३०, पारनेर १६, संगमनेर २५, श्रीगोंदे ३०, नेवासा १६, पाथर्डी २० व अकोले १३ अशा एकूण २५० बस पंढरपूरसाठी जादा सोडण्यात येणार आहेत.