रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एसटीचे ३२४ कर्मचारी शनिवारी कामावर हजर असून चालक-वाहकांची संख्या वाढल्याने  जिल्ह्यात सुमारे ५० फेऱ्यांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली.दरम्यान संपाच्या १९ व्या दिवशी कामगारांनी धरणे आंदोलन चालू आहे. जिल्ह्यातील सुमारे चार हजार कर्मचारी अजूनही संपावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माळनाका येथील एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन चालू ठेवण्यासंदर्भात दररोज चर्चा केली जाते.

तेथे बहुसंख्य कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी वाहतूक आणखी काही दिवस तरी विस्कळित राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील निर्णयानुसार हे कर्मचारी येथे आंदोलन करत आहेत. त्यामुळे कामावर हजर होण्यासंदर्भात आता मुंबईतून ठरेल त्यानुसार पावले उचलली जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

 जिल्ह्यात शनिवारी सुमारे ५० फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यापैकी देवरूख आगारातून सर्वांत जास्त, १६, तर त्या खालोखाल दापोली (१४), चिपळूण (१२), राजापूर (८) आणि खेड (२) या आगारांमधूनही गाडय़ा सोडण्यात आल्या.

यामुळे प्रवाशांनी चालक, वाहकांचे आभार मानले. कारण गेले १९ दिवस प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यांचा कर्मचाऱ्यांना पाठिंबाही आहे. परंतु कामावर जाण्यासाठी किंवा शाळा, कॉलेजमध्ये जाण्याकरिता सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ते संप मिटण्याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, शनिवारी २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागातील एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ११० झाली आहे. याचबरोबर, ३१ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

राजापूर एसटी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट, २२ जण कामावर रुजू

राजापूर : राजापूर आगारातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी तांत्रिक कार्यशाळेचे १८ आणि ४ चालक-वाहक  मिळून २२ कर्मचारी शनिवारी कामावर रूजू झाले.  या माघारीमुळे आगारातील एकूण हजर कर्मचाऱ्यांची संख्या ४१  वर पोचली आहे. त्यामुळे संपामध्ये काहीशी फूट पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 दरम्यान, अशा प्रकारे मनुष्यबळ वाढल्याने आगारातून  शनिवारी एकूण ११ एसटी बस सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी दिली.

 राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी कर्मचाऱ्यांनी गेल्या वीस दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये राजापूर आगारातील २०० पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामध्ये कायम व रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आगाराबाहेर तंबू ठोकून हे कर्मचारी दिवसभर या संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत आगारातील ९ कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर १५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावल्या. मात्र शासनाकडून पगार वाढीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्यातील काही आगारातील कर्मचारी कामावर रूजू होऊ  लागले आहेत. त्यातून राजापूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडली. माघार घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ रूजू करून घेण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख राजेश पथरे यांनी दिली आहे.

दिवसभरात राजापूर आगारातून राजापूर—हातदे, पाचल—आंबा, बुरंबेवाडी, नाटे, तारळ, राजापूर—जांभवली या मार्गावर फेऱ्या सोडण्यात आल्या.

नाशिकहून काही प्रमाणात बससेवा सुरु

नाशिक – राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा संप २२ व्या दिवशीही सुरु राहिला तरी काही कर्मचारी कामावर परतल्याने शनिवारी नाशिक आगारातून काही प्रमाणात बससेवा सुरू झाली. दुसरीकडे संप मोडीत काढण्यासाठी मंडळ दबाव आणत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

संपकरी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. परिवहन मंत्र्यांकडून  वेतनवाढ जाहीर करण्यात आली असली तरी कर्मचारी कामावर न परतल्यास निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर शनिवारी काही कर्मचारी कामावर परतले.  त्यामुळे शहरातील बससेवा सुरू झाली. कामावर परतलेल्यांची नेमकी संख्या किती, याविषयी प्रशासनाकडून कोणतीच आकडेवारी देण्यात आली नाही. संपकऱ्यांकडून विरोध होऊ नये यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत बससेवा आगारातून सोडण्यात आल्या. मुख्य आगारातून पुणे, धुळे, त्र्यंबकेश्वर, सटाणा, मालेगाव, बोरिवली, कसारा, नांदुरीगड, लासलगाव, औरंगाबाद, िवचुर यासह अन्य ठिकाणी ३४ हून अधिक बस धावल्याचा दावा विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी केला.

सायंकाळी उशीरापर्यंत ३५ हून अधिक फेऱ्या झाल्या असून त्र्यंबकेश्वर, पुणे, कसारा भागात बससेवेला सर्वाधिक गर्दी आहे. ग्रामीण भागात अद्याप पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होऊ शकली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

बससेवा सुरू असल्याचा दावा खोटा असल्याचे कामगार नेते चिंतामण सानप यांनी म्हटले आहे. कुठल्याही आगारातून बस सुटलेली नाही. कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. उलटपक्षी कामगारांना महामंडळ प्रशासन वेगवेगळय़ा माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.

पतसंस्थेच्या निवडणुका पाहता नेतेमंडळीकडून आमिषे दाखवली जात आहेत, धमकीवजा इशारा देण्यात येत असल्याचे सानप यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc strike break 324 st employees join duty in ratnagiri district zws
First published on: 28-11-2021 at 00:16 IST