अहिल्यानगर : नगर शहर, एमआयडीसी यासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी सिंचनासाठी वरदायी असलेल्या मुळा धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव अखेर जलसंपदा मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.
मुळा धरणाच्या सांडव्यावरील दरवाजांना ०.५० मी. चे (१.६४ फूट उंचीचे) फ्लॅप लावून मुळा धरणात ९९५ दलघफू नवा पाणीसाठा त्यामुळे निर्माण होणार आहे. त्यामुळे ४४७९ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी अतिरिक्त भूसंपादन नव्याने करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे जलसंपदाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुळा धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावास अनुकूलता दर्शवली. त्यानंतरच हा प्रस्ताव धाडण्यात आला आहे. जलसंपदा मंत्रालयाच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तो पाठवला जाईल. मुळा धरणाला ११ दरवाजे आहेत. या सर्व दरवाज्यांवर ०.५० मी. चे फ्लॅप लावून उंची वाढवली जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर या गावाजवळ मुळा नदीवर १९५८ च्या अखेरीस मुळा धरणाचे बांधकाम सुरू करण्यात आले. १९७१ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. १९७२ पासून सिंचन सुरू करण्यात आले. मुळा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १ लाख ६१ हजार ३८६ हेक्टर आहे तर एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३८ हजार ७९२ हेक्टर व सिंचनक्षम क्षेत्र ८७ हजार १५९ हेक्टर इतके आहे. या लाभक्षेत्रात नगर, राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांचा समावेश आहे.
मूळ प्रकल्पीय अहवालानुसार बिगर सिंचनाची तरतूद २०८८.१७ दलघफू इतकी होती. परंतु प्रत्यक्षात वाढते नागरिकीकरण, औद्योगीकरण आदी कारणांमुळे बिगर सिंचनासाठीच्या तरतुदीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी वापराची १७३९.५१ दलघफू इतकी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुमारे ७८३२ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी झाले आहे.
गाळामुळे पाणीसाठा कमी
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (नाशिक) यांनी सन २००९ मध्ये केलेल्या मुळा धरण गाळ सर्वेक्षणानुसार पिंपळगाव खांड या प्रकल्पास दिलेल्या ३३४.०८ पाणी वापर जाता मुळा धरणात २०१७ च्या सर्वेक्षणानुसार एकूण २६१०.१२ इतका पाणीसाठा करणे शक्य आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (नाशिक) यांनी तांत्रिक अभ्यास केल्यानंतर मुळा धरणाची सांडव्यावरील दरवाजांना ०.५० मी. चे फ्लॅप लावून उंची वाढवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे कळवले.
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरत असले तरी गाळ साठ्यामुळे प्रत्यक्षात कमी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या सांडव्यावरील दरवाजांना ०.५० मी. चे फ्लॅप लावून मुळा धरणात ‘एरिया कपॅसिटी कर्व्ह’नुसार ९९५ दलघफू पाणीसाठा होऊ शकतो, असा अहवाल दिला आहे.
४४७९ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होणार
मुळा प्रकल्पाचे भूसंपादन १८२४ फुट या पातळीपर्यंत करण्यात आलेले आहे. सध्याची पूर्ण संचय पातळी १८१२ फूट असून पूर पातळी १८१५ फूट आहे. त्यामुळे धरणाची उंची ०.५० मी वाढवल्यास त्याकरिता अतिरिक्त नव्याने भूसंपादन करण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच ९९५ दलघफू उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सद्यस्थितीत बिगर सिंचनामध्ये वाढ झाल्यामुळे, कमी झालेल्या ७८३२ हेक्टर सिंचन क्षेत्रपैकी ४४७९ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे.
अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा वाढते नागरिकीकरण, औद्योगीकरण यासाठी होणार आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
