रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्ग व इतर राज्य मार्गांवरील कामांमध्ये दिरंगाई व हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोकणात गणेशोत्सव कालावधीत कोणताच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी ते रत्नागिरी दरम्यानच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कशेडी बोगद्याच्या पोलादपूर बाजूला मंत्री भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपस्थितांमध्ये शिवसेना माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे यांचा समावेश होता. या सर्वांनी मंत्री भोसले यांची भेट घेऊन महामार्ग कामाबाबत चर्चा केली.
यावेळी शिवेंद्रराजे मंत्री भोसले म्हणाले, कशेडी बोगद्याच्या गळतीवर उपाययोजना सुरू असून या कशेडी बोगद्यामध्ये सध्या पाण्याची गळती आहे. मात्र बोगद्याला धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, बोगद्यातील पाणी गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, हे काम लवकरच पूर्ण केली जाईल, असे सांगून चिपळूण येथे सळई पडून जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी संबंधित ठेकेदाराकडून मदत करण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांच्या सोयीसाठी हे काम वेळेत पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.