Mumbai Municipal Corporation मुंबई : आझाद मैदान व आसपासच्या परिसरातील स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने हजारो कामगार – कर्मचारी आणि विविध उपकरणांच्या साहाय्याने सोमवार मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्रीच्या सत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची कार्यवाही केली. तर, मंगळवारीही हजारहून अधिक कर्मचारी आझाद मैदान आणि परिसरातील स्वच्छतेसाठी तैनात होते. पाच दिवसांत पालिकेने एकूण ५ टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. दरम्यान, मराठा आंदोलकांनाही स्वच्छता कामांमध्ये महापालिकेला साहाय्य केले.
महानगरपालिका प्रशासनातर्फे आझाद मैदान व आसपासच्या परिसरात पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालये आदी सोयी-सुविधाही पुरविण्यात येत होत्या. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आझाद मैदान, महानगरपालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पथके तैनात केली होती. महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागातील यंत्रणाचा त्यात समावेश होता. १ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ दरम्यानच्या कालावधीत सुमारे ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान व परिसरात स्वच्छता केली. त्या ठिकाणी विविध अद्ययावत संयंत्रे तैनात करण्यात आली होती. त्यावेळी पालिकेने आंदोलकांनाही स्वच्छतेचे आवाहन केले होते. पालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. महापालिकेच्या घनकचरा विभागाने पाच दिवसात १०१ टन कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली. २९ ऑगस्ट रोजी ४ टन, तर ३० ऑगस्ट रोजी ७ टन कचरा जमा झाला. त्यांनतर, ३१ ऑगस्ट रोजी ३० टन, १ सप्टेंबर रोजी ३० टन व २ सप्टेंबर रोजी (पहिले सत्र) ३० टन कचरा जमा करण्यात आला.
आझाद मैदान व आसपासच्या परिसरामध्ये लवकरात लवकर स्वच्छता व्हावी आणि परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एका लार्ज कॉम्पॅक्टरचा वापर करण्यात आला. कचरा संकलनाची ५ लहान आकाराची वाहनेही कार्यरत होती. कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने आंदोलनस्थळी सुमारे २ हजार थैल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच कचरा संकलनाच्या पेट्याही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आंदोलकांसाठी नियमित, तसेच फिरती अशी दोन्ही प्रकारची मिळून ४५० हून अधिक शौचकूपे उपलब्ध करण्यात आली होती. रात्रीच्या सत्रामध्ये सक्शन संयंत्राद्वारे, तसेच जेट स्प्रे संयंत्रांचा वापर करून सर्व शौचकूपे स्वच्छ करण्यात आली.
आंदोलनस्थळी पुरवण्यात आलेल्या इतर सोयी-सुविधा
१) आंदोलनस्थळी प्रकाश व्यवस्थेसाठी प्रखर झोत असलेल्या ४० दिव्यांचा समावेश असलेला मनोरा
२) पिण्याच्या पाण्याचे २५ टँकर्स
३) स्वतंत्र वैद्यकीय कक्ष
४) ठिकठिकाणी कीटकनाशक आणि जंतूनाशक भुकटी (powder) फवारणी
५) कीटक नियंत्रण विभागाच्या चमूमार्फत धूम्रफवारणी, तसेच औषध फवारणी