अलिबाग : मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आज दुपारी एक तासासाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सर्व प्रकारची वाहतूक एक तासासाठी रोखून धरली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे कोन ब्रिज 22 केव्ही क्षमतेच्या भातान आजीवली वाहिनीचे काम केले जाणार आहे. दुपारी 2 ते दुपारी 3 या कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या एक तासाच्या कालावधीत मुंबई आणि पुणे दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
या कालावधीत कळंबोली येथून दुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवली जाणार आहे. तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक खोपोली एक्झिट मार्गे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवली जाणार आहे.

