Mumbra Accident : मुंबईजवळच्या दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान ९ जून रोजी मोठा अपघात झाला होता. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी ९.२० च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेची चर्चा पावसाळी अधिवेशनात झाली. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
हा अपघात नेमका कसा झाला होता?
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ९ जूनला ही माहिती दिली की, कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणारी लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती. काही प्रवासी फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते. त्याचवेळी सीएसएमटीवरून डाऊन दिशेला जाणारी एक लोकल समोरून आली. ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे दोन रेल्वे रुळांमधील अंतर कमी आहे. तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते, त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना घासले गेले, त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या. त्यामुळे दरवाजात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले, ज्यातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर लोकलमधील गर्दीचा विषय पुन्हा चर्चेला आला होता. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी खासगी आस्थापनांनी शिफ्ट ड्युटी सुरु करण्याची चर्चा त्यावेळी झाली होती. अतुल भातखळकर यांनी हाच मुद्दा विधानसभेत मांडला.
अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला मुंब्रा अपघाताचा मुद्दा
मुंब्रा रेल्वे अपघातावर विधानसभेत चर्चा करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, खासगी आस्थापनांच्या वेळांमध्ये बदल करण्याच्याबाबत राज्य सरकार, रेल्वे यांच्यातर्फे टास्क फोर्स स्थापन केला गेला तर खासगी आस्थापनांशी चर्चा करता येईल. टास्क फोर्स स्थापन केला जाणार का? यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं.
प्रताप सरनाईक यांनी काय सांगितलं?
प्रताप सरनाईक म्हणाले, “कर्मचाऱ्यांना हे सांगण्यात आलं आहे की तुम्ही जर ९ ऐवजी ९.३० ला किंवा १० वाजता आला तरीही तुम्हाला कामाची वेळ ही ५.३० किंवा ६ पर्यंत किंवा त्यापुढे वाढवून देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का? याचा विचार सरकार करतं आहे. खासगी आस्थापनांच्या बाबतीत भातखळकर यांनी जी सूचना मांडली ती योग्यच आहे. टास्कफोर्स स्थापन केला जाईल आणि आम्ही खासगी आस्थापनांशी चर्चा करु. ” अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.