मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यास आपली हरकत नाही, मात्र सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना राजकीय आरक्षण मागत असाल तर त्याला आपला विरोध आहे, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर संत भगवानबाबा यांच्या ४९व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी गडाचे महंत नामदेव शास्त्री होते. छत्रपती संभाजीराजे भोसले, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, महादेव जानकर या वेळी व्यासपीठावर होते.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. हा धागा पकडून मुंडे म्हणाले,ह्वआपल्या रक्तातच समतेचे विचार आहेत. इतरांसारखा दुटप्पीपणा आपल्याकडे नाही. केवळ मीच नाहीतर भुजबळ यांचाही मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्यास विरोध नाही. ते त्यांना मिळालेच पाहिजे. मात्र, राजकीय आरक्षणाला माझा व भुजबळांचाही विरोध आहे. जिल्हा बँकांपासून ते राज्य सहकारी बँकेपर्यंतची सर्व सत्तास्थाने तुमच्या ताब्यात असताना राजकीय आरक्षण मागणे चुकीचे आहे. मराठा समाज या हक्कापासून वंचित असता तर आपणही त्यासाठी लढलो असतो. मात्र खोटी प्रमाणपत्रे देऊन आमची पदेही हिरावता, मग राजकीय आरक्षण कशासाठी हवे?ह्व
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत आमचाही वाटा आहे.अरबी समुद्रात शिवाजीमहाराजांचे स्मारक उभारण्याच्या वल्गना करून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी तीनदा राज्यातील निवडणुकाजिंकल्या, मात्र हे स्मारक अजूनही उभे राहिले नाही. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मात्र निश्चितपणे शिवरायांचे भव्य स्मारक उभारू. सध्याचे सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, ती हिंमत त्यांच्यामध्ये नाही, अशी टीका मुंडे यांनी केली. भुजबळांच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना त्यांनी ‘बहुधा बारामतीवाले रागावले असतील, म्हणून ते आज येथे आले नसावेत. पण आम्ही दोघेही एकच आहोत. लवकरच भुजबळ यांनाही गडावर आणू’ अशी कोपरखळी मुंडे यांनी मारली.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, समाजाची अवस्था भीषण आहे. मात्र तरीही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची मागणी असून त्यासाठीच आपण राज्यभर फिरतो आहोत.
आंबेडकर यांचेही या वेळी भाषण झाले. सुरुवातीला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.
वणवा हा आणि तो.. : भगवानगडावर मुंडे यंदा प्रथमच हेलिकॉप्टरने आले. गडाच्या खाली हेलिपॅड होते. ते गडावर आल्यानंतर काही वेळाने हेलिपॅडच्या सभोवतालच्या वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने येथे वणवा लागला. अग्निशमन यंत्रणेने वेळीच हा वणवा नियंत्रणात आणला, मात्र त्याचा संदर्भ देऊन हा वणवा कोणीतरी जाणीवपूर्वक लावलेला असावा, असा आरोप मुंडे यांनी केला व आता आपणही आता राज्यात राजकीय वणवा पेटवू, असा इशारा त्यांनी दिला.